बेघरांचा मुक्काम पदपथावर 

योगेश पिंगळे
शनिवार, 12 मे 2018

बेलापूर - नवी मुंबई महापालिकेने बेघर आणि निराश्रितांसाठी बेलापूर येथे केवळ एकच "रात्र निवारा केंद्र' सुरू केले असल्याने शहराच्या इतर भागातील बेघर नागरिक पदपथांवरच मुक्काम करत आहेत. त्यामुळे मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे महापालिकाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. 

बेलापूर - नवी मुंबई महापालिकेने बेघर आणि निराश्रितांसाठी बेलापूर येथे केवळ एकच "रात्र निवारा केंद्र' सुरू केले असल्याने शहराच्या इतर भागातील बेघर नागरिक पदपथांवरच मुक्काम करत आहेत. त्यामुळे मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे महापालिकाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. 

निवारा ही मूलभूत गरज असल्याने आणि पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरात बेघर, निराश्रितांना रस्ते, पदपथावर किंवा उघड्यावर झोपावे लागू नये यासाठी रात्र निवारा केंद्राची सुविधा देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार संबंधित प्राधिकरणांनी जागा द्यायच्या असतात. तेथे रात्र निवारा निवारा केंद्र बांधण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने 100 टक्के अनुदान दिले जाते. नवी मुंबई महापालिकेने 2014 मध्ये पावणे एमआयडीसीतील श्रमिकनगर येथे समाज मंदिरात रात्र निवारा केंद्र सुरू केले होते. परंतु ते शहराच्या एका बाजूला असल्याने बंद झाले. त्यानंतर तुर्भे सेक्‍टर- 21 येथील समाज मंदिरात रात्र निवारा केंद्र सुरू करण्यात आले होते. त्याला परिसरातील नागरिकांनी विरोध केल्याने तेही बंद झाले. अग्रोळी उड्डाणपुलाखाली पालिकेने रात्र निवारा केंद्र सुरू केले असून ते शहराच्या एका बाजूला असल्याने शहराच्या इतर भागातील बेघर निराश्रितांना त्याचा फायदा होत नाही. 

2016-17 मध्ये पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात 127 बेघर आणि निराश्रित व्यक्ती आहेत. परंतु बेलापूर येथील पालिकेच्या एकमेव रात्र निवारा केंद्रात केवळ 12 ते 15 बेघर आहेत. नेरूळ सेक्‍टर 9 मधील पदपथावर अनेक वर्षांपासून बेघर आणि निराश्रित नागरिक वास्तव्य करत आहेत. त्यांना टीबीसारख्या आजारांनी ग्रासले आहे. पालिकेकडून त्यांना मार्गदर्शन आणि मदत मिळत नाही. या नागरिकांच्या पदपथावरील वास्तव्यामुळे परिसरातील रहिवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. परंतु पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. 

घणसोलीत नवे रात्र निवारा केंद्र 
घणसोली सेक्‍टर- 4 येथील भूखंड रात्र निवारा केंद्रासाठी आरक्षित आहे. तेथे ते बांधण्यात येणार आहे. यात तळ आणि तीन मजल्यांच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी 33 लाख खर्च येणार आहे. सरकारकडून पालिकेला अनुदानही मिळाले आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर किचन, कॅंटीन, दिव्यांगांसाठी खोली, शौचालय, पहिल्या मजल्यावर पुरुषांसाठी हॉल, सर्व्हिस रूम, शौचालय, दुसऱ्या मजल्यावर महिलांसाठी हॉल, सर्व्हिस रूम, शौचालय, तिसऱ्या मजल्यावर कुटुंबासाठी चार स्वतंत्र खोल्या, किचन, सर्व्हिस रूम, शौचालय आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. त्याचे बांधकाम सुरू झाले आहे. 

शहरातील बेघर आणि निराश्रितांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात 127 बेघर व निराश्रित आढळले आहेत. त्यांचे समुपदेशन करून त्यांना अग्रोळी उड्डाणपुलाखालील रात्र निवारा केंद्रात ठेवले जाते. नेरूळ सेक्‍टर- 9 येथील बेघर, निराश्रितांची माहिती घेण्यात येईल. घणसोली येथील रात्र निवारा केंद्राचे बांधकाम सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. 
- तृप्ती सांडभोर, उपायुक्त, समाज विकास विभाग 

नेरूळ सेक्‍टर- 9 मध्ये पदपथावर राहणाऱ्या नागरिकांच्या राहण्याची सोय रात्र निवारा केंद्रात करावी यासाठी अनेकदा मागणी केली. त्या वेळी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी या व्यक्तींना रात्र निवारा केंद्रात नेणार असल्याचे सांगितले होते; परंतु आजही ते पदपथावरच आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा पालिकेने त्यांना निवारा केंद्रात स्थलांतरित करावे. 
- मीरा पाटील, नगरसेविका 

Web Title: Homeless issue in navi mumbai