हुतात्म्यांच्या वारसांना घरे ; व्हॉट्‌सऍप मेसेजद्वारे योजनेचा राज्यभर प्रचार

गोविंद तुपे
गुरुवार, 3 मे 2018

व्हॉट्‌सऍपवरून मेसेज व्हायरल झाल्यानंतर त्याची खातरजमा करण्यासाठी म्हाडाच्या कार्यालयात शेकडो नागरिकांनी फोन केले. त्यात हुतात्म्यांच्या तीन वारसांचाही समावेश होता. सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे पाच वर्षांपासून राखून ठेवलेल्या घरांचा लाभ हुतात्म्यांच्या वारसांना मिळणार आहे. 
- संजय भागवत, सहमुख्य अधिकारी, म्हाडा. 

मुंबई : संयुक्त महाराष्ट्र राज्य चळवळीतील हुतात्म्यांच्या वारसांना मुंबईत मोफत घरे देण्याचा 2013 मध्ये राज्य सरकारने निर्णय घेतला होता. या योजनेचा फारसा प्रचार न झाल्याने पाच वर्षांत केवळ दोनच हुतात्म्यांच्या वारसांनी म्हाडाकडे संपर्क साधला. या योजनेची माहिती सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी व्हॉट्‌सऍपवरून त्याचा संदेश व्हायरल केला. त्यानंतर एका दिवसात हुतात्म्यांच्या तीन वारसांनी म्हाडाकडे संपर्क साधल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्म्यांसाठी गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या घरांपैकी 23 घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. पाच वर्षांत या घरांसाठी दोन वारसांनीच म्हाडाकडे संपर्क साधला होता. या योजनेविषयी कुणाला फारसे माहीत नसल्याने जाहिरात देण्याबाबत म्हाडातर्फे विचार सुरू होता;

मात्र काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक व्हॉट्‌सऍप मेसेज तयार करून त्यात या योजनेची माहिती दिली. तसेच संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेलही दिला होता. हा मेसेज वाचल्यानंतर पुढे पाठवण्याचे अव्हानही त्यात करण्यात आले. त्यामुळे हा मेसेज राज्यभर फिरला आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: Homes to the Martyr Family