कामोठ्यात भटक्‍या कुत्र्यांची दहशत

सकाळ वृत्‍तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

निर्बीजीकरण केंद्र बंद असल्याने भटक्‍या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे कठिण

नवीन पनवेल : कामोठे शहराच्या काही भागात भटक्‍या कुत्र्यांची दहशत वाढली असून रात्रीच्या वेळी वाहनांचा पाठलाग करणे, अंगावर धाऊन जाणे आणि अचानक वाहनांच्या आडवे येऊन अपघातास कारणीभूत ठरण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघातास सामोरे जाण्याच्या; तर कधी कुत्र्याच्या अंगावर गाडी जाऊन गंभीर स्वरूपाच्या अपघाताच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे कामोठ्यात पुन्हा एकदा भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्न समोर आला आहे. 

वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, महिलांना रस्त्यावरून चालताना भटक्‍या कुत्र्यांची भीती आहे. श्वानदंशाच्याही अनेक घटना या ठिकाणी घडल्या आहेत. शहराच्या काही भागात व नाक्‍यावर रात्रीच्या वेळेस भटके कुत्रे अगदी टोळीने उभे असतात. दुचाकी आली की त्यांच्या मागे हे कुत्रे एकामागून एक लागत असल्याने अपघाताचे अनेक प्रकार घडले आहेत. भटके कुत्रे मागे लागल्याने दुचाकी चालक वाहन वेगाने चालवतात. परिणामी नागरिकांना अपघातास सामोरे जावे लागते.

पनवेल येथील निर्बीजीकरण केंद्र बंद असल्याने भटक्‍या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण राहिले नसल्याने त्यांची संख्या वाढतच चालली आहे. रात्री दहानंतर शहरातील प्रमुख भागात भटक्‍या कुत्र्यांचे साम्राज्य आहे. कळंबोली, रोडपालीमधून मानसरोवरला जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. भटक्‍या कुत्र्यांचा लवकरात लवकर प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासी व रहिवाशांनी केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The horror of wandering dogs