माथेरानमध्ये घोडे अडले

अजय कदम : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

मिनी ट्रेन शटल सेवा बंद असल्याने माथेरानमधील व्यावसायिक माल वाहतुकीसाठी घोडेवाल्यांवर अवलंबून आहेत. त्याचाच फायदा घेत माल वाहतुकीची दरवाढ लागू केली आहे.

माथेरान : मिनी ट्रेन शटल सेवा बंद असल्याने माथेरानमधील व्यावसायिक माल वाहतुकीसाठी घोडेवाल्यांवर अवलंबून आहेत. त्याचाच फायदा घेत माल वाहतुकीची दरवाढ लागू केली आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटले असून हॉटेल व्यावसायिक, दुकानदारांनी माल संपल्यानंतर हॉटेल आणि अन्य व्यवसाय बंद करण्याचा इशारा दिला आहे. 

मुसळधार पावसानंतर माथेरान-नेरळ मिनी ट्रेनबरोबर अमन लॉज ते बाजारपेठ ही शटल सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि दुकानदारांसाठी घोड्यावरून माल आणला जातो. त्याचा फायदा घेत घोडेवाल्यांकडून शंभर किलो माल वाहतुकीचा दर १८० रुपयांवरून २०० रुपये करण्यात आला आहे. त्याला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. याबाबत व्यापारी फेडरेशनने येथील विशेष कार्यकारी दंडाधिकारी, अधीक्षक बापूराव भोई यांना लेखी निवेदन दिले आहे. 
मिनी ट्रेन बंद असल्यामुळे घोडेवाले वेठीस धरत आहेत. दिवाळीच्या काळात माथेरानमध्ये पर्यटन हंगाम असतो. या पर्यटन हंगामात जुना माल असेपर्यंत व असलेला माल संपल्यानंतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर पर्यटकांना होणाऱ्या त्रासाला स्थानिक प्रशासनच जबाबदार असेल, असे या निवेदनात नमूद केले आहे. 

हे निवेदन नगराध्यक्षांसह सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत काळे यांना देण्यात आले आहे. या वेळी भाजप शहराध्यक्ष विलास पाटील, माजी नगरसेवक अरविंद शेलार, व्यापारी फेडरेशनचे सचिव मनोज जांभळे, व्यापारी मुकेश शाह, कुलदीप जाधव आणि नगरसेवक चंद्रकांत जाधव उपस्थित होते.

मिनी ट्रेन बंद झाल्यामुळे घोड्यावर माल येत होता. पण घोडेवाल्यांनी त्याचा फायदा घेतला आहे. त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता दर वाढवला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर आर्थिक बोजा पडत आहे. ही बाब सरकारने गंभीर्याने घेणे आवश्‍यक आहे. माल संपल्यानंतर माथेरानमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
- राजेश चौधरी, अध्यक्ष, व्यापारी फेडरेशन

व्यापारी आणि घोडेवाल्यांमधील वादानंतर निवेदन मिळाले आहे. या प्रश्‍नावर मंगळवारपर्यंत तोडगा काढण्यात येणार आहे. 
- बापूराव भोई, अधीक्षक, माथेरान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: horse riders raise their rate for Goods transports