सहायक आयुक्तांवर रुग्णालयांचा भार

सहायक आयुक्तांवर रुग्णालयांचा भार

मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने मुंबईकरांच्या आरोग्याचा भार सहायक आयुक्तांच्या हाती सोपवला आहे. पालिकेच्या प्रमुख तीन रुग्णालयात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केली आहे. पालिका सभागृहाच्या विरोधानंतरही प्रशासनाने सीईओ नेमल्याने हा वाद आता पेटणार आहे.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत आतापर्यंत विविध दुर्घटना घडल्या आहेत. नुकतेच केईएम रुग्णालयात ईसीजी मशीनमध्ये स्फोट होऊन चार महिन्यांच्या प्रिन्स नामक बालकाला हात गमवावा लागला. या प्रकरणाचे महासभेत पडसाद उमटले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चौकशी समिती नेमली असून रुग्णालयांच्या सुसूत्रता आणण्यासाठी प्रमुख रुग्णालयात सीईओ नेमण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला; मात्र त्यानंतरही प्रशासनाने तीन रुग्णालयात मुख्य कार्यकारी अधिकारी नेमले आहेत. 

जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याकडे केईएम आणि शीव रुग्णालयांची, के-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्याकडे कूपर रुग्णालयाची, तर पी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देविदास क्षीरसागर यांच्याकडे नायर रुग्णालय आणि नायर दंत रुग्णालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रुग्णालयाशी संबंधित प्रशासकीय कामकाज, किरकोळ नागरी, यांत्रिकी आणि विद्युतसंबंधीच्या दुरुस्त्यांबाबत तत्काळ निर्णय घेण्याची जबाबदारी सीईओवर असणार आहे. रुग्णालयातील नागरी, यांत्रिकी कामाचा आढावा घेण्यासाठी सीईओला दर आठवड्याला उपस्थित राहावे लागणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com