रुग्णालयांत डॉक्‍टरांची वानवा!

रुग्णालयांत डॉक्‍टरांची वानवा!

नवी मुंबई - डॉक्‍टरांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव फेटाळल्याचा फटका महापालिकेच्या आरोग्य सेवेला बसला आहे. हा प्रस्ताव फेटाळल्यामुळे महापालिकेच्या कायम आस्थापनेवरील १० ते १२ डॉक्‍टर काही महिन्यांत निवृत्त होणार आहेत. त्यामुळे अगोदरच डॉक्‍टरांची कमतरता असलेल्या महापालिका रुग्णालयांची सेवा कोलमडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्याचा फटका सामान्य रुग्णांना बसणार आहे. 

नवी मुंबई महापालिकेची शहरात सहा रुग्णालये आहेत. त्यातील वाशी रुग्णालय सोडले, तर एकही रुग्णालय सुस्थितीत नाही. महापालिकेकडे तज्ज्ञ डॉक्‍टर नसल्याने ऐरोली, नेरूळ, बेलापूर येथील रुग्णालये कशीबशी सुरू आहेत. सरकारने मंजूर केलेल्या ३३३ संवर्गांतील डॉक्‍टरांपैकी १२९ कायम आस्थापनेवर आणि १७ तात्पुरत्या आस्थापनेवर अशा महापालिकेने १४६ डॉक्‍टरांच्या जागा भरल्या आहेत. त्यानंतरही पालिका रुग्णालयांमध्ये १८७ जागा रिक्त आहेत. त्यामुळे डॉक्‍टरांच्या या जागा भरण्यासाठी महापालिकेने थेट मुलाखती सुरू केल्या आहेत. दर आठवड्याला या मुलाखती सुरू आहेत. महापालिका तात्पुरत्या आस्थापनांवर नियुक्ती करत असल्याने महापालिकेच्या मुलाखतींकडे अनेक डॉक्‍टरांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्‍टर मिळत नसल्याने महापालिकेच्या अनेक रुग्णालयांत डॉक्‍टरांअभावी रुग्णांना सुविधा मिळत नाही. फिजिशियन, शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ अशा उच्च श्रेणीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सध्या महापालिका रुग्णालयांत तुटवडा आहे. 

महापालिका आणि राज्यातील इतर रुग्णालयांमध्येही डॉक्‍टरांचा तुटवडा असल्याने राज्य सरकारने डॉक्‍टरांच्या निवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांत शिकवणाऱ्या डॉक्‍टरांची वयोमर्यादा ५८ वरून ६२; तर यूजीसीने विद्यापीठात नियुक्त केलेल्या डॉक्‍टरांची वयोमर्यादा ६५ केली आहे. असे असतानाही डॉक्‍टरांच्या निवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फेब्रुवारीत आणलेला प्रस्ताव लोकप्रतिनिधींनी फेटाळला. त्याचा फटका आता महापालिकेच्या वैद्यकीय सेवेला बसत आहे. निवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे महापालिकेच्या कायम आस्थापनांवरील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश निकम यांच्यासह १२ डॉक्‍टर निवृत्त होणार आहेत. परंतु, सध्या महापालिकेच्या मुलाखतींना मिळणारा प्रतिसाद पाहता, रिक्त झालेल्या आणि होणाऱ्या जागा भरणे अवघड आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयांमधील आरोग्य सेवा कोलमडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

नवी मुंबई महापालिका रुग्णालयांत चांगली आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. असे असताना आता रडत कडत सुरू असलेली काही रुग्णालयांची सेवा डॉक्टर नसल्यामुळे कोलमडून त्याचा फटका गरीब रुग्णांना बसणार आहे.
 
रुग्णसेवेची वाताहत
महापालिकेच्या महासभेत डॉक्‍टर उपलब्ध नसल्याने अनेकदा प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलांची प्रसूती रिक्षा व रुग्णवाहिकेत झाली आहे. ऐरोली येथे गर्भवती महिलेची रिक्षात प्रसूती झालेले उदाहरण ताजे आहे, तर रुग्णालयात आवश्‍यक यंत्र नसल्याने अनेक महत्त्वांच्या आजारांच्या चाचण्या होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना चाचणीसाठी बाहेर पाठवावे लागते. तसेच लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आवश्‍यक असलेले व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याने लहान मुलांच्या पालकांना खासगी दवाखान्यांत धाव घेऊन खिसा खाली करावा लागला आहे.

मर्जीतील डॉक्‍टरांसाठी खटाटोप 
वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश निकम येत्या जून महिन्यात निवृत्त झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी ही जागा रिक्त होणार आहे. या जागेवर सेवाज्येष्ठतेनुसार आपली वर्णी लागावी यासाठी आरोग्य विभागातील अनेक वरिष्ठ डॉक्‍टरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काहींनी तर मर्जीतील अधिकाऱ्याची वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती व्हावी यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे; मात्र निकम यांच्यानंतर महापालिकेला हव्या असलेल्या योग्यतेचा अधिकारी न भेटल्यास योग्य वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी महापालिका प्रशासनाकडून थेट राज्य सरकारला साकडे घालण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com