रुग्णालयांतील गोतावळा बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

मुंबई - रुग्णालयांत रुग्णांना पाहायला येणाऱ्या नातेवाइकांचा गोतावळा यापुढे बंद होणार आहे. रुग्णांना सकाळी एक तास आणि संध्याकाळी दोन तास असे दिवसातून केवळ तीन तासच भेटीची वेळ असेल. जे. जे. रुग्णालयांतील मारहाणीच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या निवासी डॉक्‍टरांच्या बैठकीत हा निर्णय झाला. राज्यातील 16 वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांत त्याची अंमजबजावणी करण्यात येईल.

अपघात विभागात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांसोबत दोन नातेवाइकांना प्रवेश देण्यात येणार आहे. रुग्णाला दाखल केल्यानंतर पास देण्यात येणार असून एका वेळी दोनच नातेवाइकांना रुग्णासोबत थांबता येईल. या निर्णयाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश महाजन यांनी दिले आहेत. जे. जे. रुग्णालयाच्या धर्तीवरच कामा, सेंट जॉर्जेस आणि जीटी रुग्णालयातही सुरक्षारक्षक आणि अलार्म यंत्रणा देण्यात येणार आहे. तेथेही नातेवाइकांना भेटण्याचे वेळापत्रक काटेकोर पाळले जाईल. जे. जे. रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाइकांनी केलेल्या मारहाणीनंतर निवासी डॉक्‍टरांनी सुरू केलेल्या सामूहिक रजा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आज महाजन यांनी निवासी डॉक्‍टरांची संघटना "मार्ड'सोबत बैठक घेतली.

सर्व विभागांतील कमी असलेली उपकरणे, औषधे खरेदी; तसेच देखभाल आणि दुरुस्तीसाठी समिती नियुक्त करण्याचे आदेश महाजन यांनी दिले आहेत.

डॉक्‍टर सुरक्षेबाबत सजग
डॉक्‍टर संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सर्व विभागांना मार्गदर्शन करेल. त्यानंतरही एखादा प्रकार घडल्यास न्यायालयीन प्रक्रियेसाठी लागणारा खर्च रुग्णालयामार्फत देण्यात येईल. तसेच निवासी डॉक्‍टरांना महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यावेतन देण्यात येणार आहे.

या वेळेत नातेवाईकांना प्रवेश
- सकाळी : 7.30 ते 8.30
- संध्याकाळी : 4.30 ते 6.30

Web Title: hospital patient relatives residence