मुंबईकर तुमचं मुंबई- ठाण्यात घरं घेण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार, वाचा ही आनंदाची बातमी

पूजा विचारे
Tuesday, 15 September 2020

म्हाडा आता मुंबई आणि ठाणे या शहरात परवडणाऱ्या दरातील घरं उभारणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.  

मुंबईः  प्रत्येकाला वाटतं आपलं एक घरं असावं. त्यात आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत घर घ्यावं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र काही कारणास्तव ते शक्य होत नाही. मात्र आता मोठ्या घराची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडा आता मुंबई आणि ठाणे या शहरात परवडणाऱ्या दरातील घरं उभारणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.  म्हाडा मुंबईतील मोकळ्या जागा खरेदी करुन त्याजागी परवडणाऱ्या दरात घरं उभारणार असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक मंत्री आपल्या पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार घेतात. जितेंद्र आव्हाडांनी आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जनता दरबार घेतला. यावेळी ते बोलत होते. पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील टागोर आणि कन्नमवार नगर या भागात मोठ्या वसाहती उभ्या करण्याचा मानस गृहनिर्माण मंत्र्यांचा आहे.

यासंदर्भात आव्हाड हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच मुंबई उपनगरात मोकळे भूखंड ताब्यात घेणार आहे. मुंबईत जे रिक्त भूखंड आहेत, त्याबाबतचे वाद न्यायप्रविष्ठ आहेत. अशा वाद असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन परवडणारी घरं बांधता येतील, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घर/सदनिका उपलब्ध करुन देता येतील. म्हाडाने 30 ते 40 वर्षापूर्वी कन्नमवार नगरसारख्या भागात म्हाडाच्या गांधीनगर, मोतीलाल नगर यासारख्या 56 वसाहती उभ्या केल्या असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. 

गोरेगावसारख्या भागातही परवडणारी घरं

गेल्या काही दिवसांपूर्वी गोरेगाव या भागात परवडणारी घरं बांधण्याच्या प्लानची घोषणा करण्यात आली. गृहनिर्माण योजना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गोरेगाव या भागात पहिल्यांदाच परवडणाऱ्या घरांचा प्लान ठाकरे सरकारनं आखला आहे. या प्लाननुसार तुम्हाला गोरेगावसारख्या भागात कमी पैशात घर मिळणार आहे. गृहनिर्माण योजना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरात पहिल्यांदाच परवडणारी घरं तयार करण्यात येणारेत.  या गृहनिर्माण योजनचं भूमिपूजन हे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याची माहिती आव्हाड यांनी दिलीय.

Housing minister jitendra awhad announce mumbai thane affordable houses mhada  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Housing minister jitendra awhad announce mumbai thane affordable houses mhada