जितेंद्र आव्हाड धावले संजय राऊतांसाठी, टीकाकारांना दिलं 'असं' उत्तर

पूजा विचारे
Tuesday, 18 August 2020

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सध्या चांगलाच वाद सुरु झाला आहे. या वादात आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे.

मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सध्या चांगलाच वाद सुरु झाला आहे. या वादात आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. आव्हाडांनी संजय राऊत यांची पाठराखण केली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद सध्या उमटत असून डॉक्टरांसह डॉक्टरांच्या संघटनांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान आता आव्हाडांनी संजय राऊत यांच्यावर टीका करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. 

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? इकडून तिकडून गोळा केलेले लोक तिथं आहेत. मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. या वक्तव्यावरुन वाद उफाळून आल्यानंतर जितेंद्र आव्हाड त्यांच्या मदतीला धावून आलेत.

हेही वाचाः गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी २ हजार ऑनलाइन नोंदणी, मात्र असेल 'ही' अट

आव्हाडांनी ट्विट करत राऊतांवर टीका करणाऱ्यांना उत्तरं दिलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या विश्वासाहर्तेबद्दल अमेरिकेनं प्रश्नचिन्ह निर्माण केलं. संबंधही तोडून टाकले. अनेक प्रख्यात डॉक्टरांनी, राष्ट्रांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभाराविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या. या विषयावर कोणीही बोलताना दिसलेलं नाही. संजय राऊत बोलले आणि वादळच आलं, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

वक्तव्यावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण 

माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. माझी तशी भावनाही नव्हती. अपमान आणि कोटी यांच्यातील फरक जाणून घेतला पाहिजे. अशाप्रकारच्या कोट्या राजकारणात होतात, वकिलांवरही होतात. कोट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा इतर कुणावरही होतात. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून एखादी कोटी झाली. खरंतर त्याचं कौतुक केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

अधिक वाचाः 'त्या' मनसैनिकासाठी राज ठाकरे यांची भावनिक पोस्ट, केली कळकळीची विनंती

तसंच मी काय बोललो आहे हे समजून न घेता काही राजकीय मंडळी काही मोहीम चालवणार असतील तर त्याला थारा देणार नाही. मी डॉक्टरांचा अपमान केलेला नसून माझ्याकडून बोलण्याच्या ओघात एखादी कोटी निघून गेली त्याचं कौतुक डॉक्टरांनी केलं पाहिजे. डॉक्टरांची ताकद एवढी अफाट आणि अचाट असते. की त्यांनी कंपाऊंडर घडवले आहेत. हे कौतुक आहे, याचा सन्मान झाला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Housing minister jitendra awhad reaction tweet sanjay raut controversial statement


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Housing minister jitendra awhad reaction tweet sanjay raut controversial statement