esakal | हवाई दलाच्या तळाजवळ इमारतींना परवानगी कशी? भाजपचा ठाणे पालिकेला सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

हवाई दलाच्या तळाजवळ इमारतींना परवानगी कशी? भाजपचा ठाणे पालिकेला सवाल

कोलशेत येथील हवाई दलाच्या तळापासून 100 मीटरपर्यंत बांधकामांना बंदीचा महापालिकेचा आदेश संभ्रम निर्माण करणारा आहे,

हवाई दलाच्या तळाजवळ इमारतींना परवानगी कशी? भाजपचा ठाणे पालिकेला सवाल

sakal_logo
By
राजेश मोरे

ठाणे : कोरोनाचे संकट असताना ठाण्यातील कोलशेत येथील हवाई दलाच्या तळापासून 100 मीटरपर्यंत बांधकामांना बंदीचा महापालिकेचा आदेश संभ्रम निर्माण करणारा आहे, असे मत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर इमारतींच्या बांधकामांना परवानगीसाठी पालिकेवर बड्या व्यक्तीचा दबाव आहे का? असा सवालही पवार यांनी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना केला आहे.

'सीबीआय, ईडी, एनसीबी चौकशीचे थेट प्रक्षेपण, आयपीएल प्रमाणेच हक्कांचा लिलाव करा'; सचिन सावंत यांचा भाजपला टोला

कोलशेत हवाई दलाच्या तळाजवळ यापूर्वी बांधकामांना परवानगी दिली जात नव्हती. मात्र, काही वर्षांपूर्वी अचानक हवाई दलातील अधिकाऱ्यांच्या एनओसीद्वारे (ना हरकत प्रमाणपत्र) महापालिकेच्या शहर विकास विभागाची परवानगी मिळवून काही विकासकांनी या परिसरात उत्तुंग इमारती उभारल्या. सध्या या इमारतींमध्ये रहिवाशीही वास्तव्याला आले आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने काढलेल्या आदेशामुळे संभ्रम निर्माण झाल्याचे पवार यांचे म्हणणे आहे. 

संरक्षण मंत्रालयाकडून हवाई दलाच्या तळांविषयीची नियमावली निश्चित केली जाते. कोलशेत येथील बिल्डरांच्या अनेक इमारतींना हवाई दलाने दिलेली एनओसी अधिकृत आहे का? शहर विकास विभागाने संबंधित एनओसीची हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली होती का, संबंधित एनओसी मिळवणारे विकासक व प्रमाणपत्र देणारे अधिकारी आदींची चौकशी करण्याची गरज असल्याची मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

'कुठलाही भाग न वगळता मुलाखत प्रसिद्ध करण्यात यावी'; भेटीबाबत देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न
एकीकडे उत्तुंग इमारतींना एनओसी देणारे हवाई दलाचे अधिकारी कोलशेत येथील भूमिपूत्रांच्या एकमजली घरांच्या दुरुस्तीलाही मज्जाव करीत आहेत, ही बाब आश्चर्यकारक आहे, याकडे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.हवाई दलाच्या तळाजवळ बड्या विकासकांच्या संकुलाला परवानगी देण्यासाठी महापालिका प्रशासनावर कोणी बडी व्यक्ती दबाव आणत आहे का, या दबावामुळे नव्याने आदेश काढून पालिका अधिकारी पळवाट शोधत आहेत का, नव्या आदेशापूर्वी झालेल्या इमारतींबाबत प्रशासनाची भूमिका काय, तळाजवळच्या इमारतींना मंजुरी देणाऱ्या शहर विकास विभागातील तत्कालीन अधिकारी व तत्कालीन महापालिका आयुक्तांची नावे जाहीर करणार का, असे प्रश्न पवार यांनी केले आहेत. 

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image