पैसेच नाहीत, तर देणार कुठून

कैलास रेडीज ः सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

मुंबई ः बॅंकिंग यंत्रणेवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बॅंकेने किराणा व्यापारी आणि पेट्रोल पंपचालकांनाही डेबिट कार्डधारकांना स्वाइप मशिनमधून दोन हजार रोख देण्याचे आदेश दिले आहेत; मात्र पुरेशी रोकड हाताशी नसल्याने कार्ड स्वाइप करणाऱ्यांना पैसे देणार कुठून? असा सवाल किराणा व्यापारी व पेट्रोल पंपचालकांनी उपस्थित केला आहे.

मुंबई ः बॅंकिंग यंत्रणेवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बॅंकेने किराणा व्यापारी आणि पेट्रोल पंपचालकांनाही डेबिट कार्डधारकांना स्वाइप मशिनमधून दोन हजार रोख देण्याचे आदेश दिले आहेत; मात्र पुरेशी रोकड हाताशी नसल्याने कार्ड स्वाइप करणाऱ्यांना पैसे देणार कुठून? असा सवाल किराणा व्यापारी व पेट्रोल पंपचालकांनी उपस्थित केला आहे.

नोटाबंदीमुळे बाजारात चलनाचा तुटवडा आहे. बॅंक आणि पोस्टातील खात्यांत नोटा बदलणे, खात्यात जमा करण्याची व्यवस्था आहे. नोटा बदलणे आणि पैसे काढण्यावर मर्यादा घातली आहे; मात्र तरीही सलग 12व्या दिवशी नागरिकांची पैसे मिळवण्यासाठी परवड सुरूच आहे. रिझर्व्ह बॅंकेने "पॉइंट ऑफ सेल' अर्थात कार्ड स्वाइप मशिन वापरणाऱ्या किराणा व्यापारी आणि पेट्रोल पंपचालकांनाही कार्डधारकांना पैसे देण्याचा आदेश दिले आहेत. नोटाबंदीने बाजाराची उलाढाल मंदावल्याने व्यापाऱ्यांकडे पैसे नाहीत. नव्या आदेशानंतर रोजचा व्यवसाय करणार, की कार्डधारकाला पैसे देणार, अशा दुहेरी कोंडीत व्यापारी अडकल्याचे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी सांगितले. बड्या मॉलधारकांना कार्डधारकांना पैसे देणे शक्‍य आहे; मात्र छोट्या-मध्यम व्यापाऱ्यांना रोकड टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

जुन्या नोटा रद्द करण्याच्या देशहिताच्या मोहिमेत पेट्रोल पंपचालकांचा पाठिंबा आहे; मात्र कार्ड स्वाइप करणाऱ्यांना रोकड देण्याच्या निर्णयाने पंपचालकांची अडचण वाढली आहे. जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा पंपचालकांना स्वीकाराताना ग्राहकांशी खटके उडत आहेत. त्यात बनावट नोटांचेही नुकसान सहन करावे लागत असल्याचे दी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले. रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशानुसार डेबिट कार्डधारकांना कार्ड स्वाइप केल्यावर दोन हजारांची रोकड द्यावी लागत आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा पंपचालकांनी तयार केली असली तरी त्याला सुरक्षा व्यवस्था आणि विमाकवच नाही. परिणामी जोखीम वाढल्याचे त्यांनी सांगितले.

जुन्या चलनी नोटा रद्द झाल्याचा परिणाम किराणा व्यवसायावर झाला आहे. दैनंदिन उलाढाल घटली असून, व्यापारांकडेदेखील रोकड टंचाई निर्माण झाली आहे. रोख रकमेची कमतरता पाहता डेबिड कार्डधारकांना कार्ड स्वाइप केल्यावर पैसे देणे सध्या तरी शक्‍य नाही.
- वीरेन शहा, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन

पेट्रोलपंपावर रोज जमा होणारी रोकड आणि कार्ड स्वाइप मशिनमधून देण्यात येणारी रोकड यांचा काहीही संबध नाही. कार्ड स्वाइपच्या व्यवहारांसाठी पंपचालकाला बॅंकेकडून दररोज एक लाख रुपये देण्यात येणार आहेत; मात्र सध्या बॅंकांना रोकड पुरत नाही. परिणामी पंपचालकांकडेदेखील कार्ड स्वाइप पेमेंटसाठी रोकड उपलब्ध नसल्याने कार्डधारकांना पैसे कुठून देणार? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
- उदय लोध,
अध्यक्ष, दी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशन

दोन टक्‍क्‍यांचा भुर्दंड का?
कार्ड स्वाइप केल्यामुळे ग्राहकांना एक ते दोन टक्के व्यवहार शुल्क सहन करावे लागत आहे. दोन हजार रुपये मिळवण्यासाठी ग्राहकांना किमान 40 ते 45 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे स्वाइप मशिनमधून मिळणारी रोकड कार्डधारकांसाठी महागडी ठरत आहे.

Web Title: how to give cash, ask traders