मराठी शाळा वाचविण्यासाठी राजकीय पक्ष काय भूमिका घेणार : श्रीपाद जोशी

मराठी शाळा वाचविण्यासाठी राजकीय पक्ष काय भूमिका घेणार : श्रीपाद जोशी

कल्याण : राज्यातील मराठी भाषिक शाळा एका पाठोपाठ एक बंद होत असल्याचे कटू सत्य आहे. महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्यासाठी राजकीय पक्ष काय भूमिका घेणार असा सवाल महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष आपल्या जाहिरनाम्यात वचननाम्यात यासाठी काय तरतूद करणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या विषयावर काम करणाऱ्या पक्षांचा तसेच उमेदवारांचाच मतदारांनी विचार करावा यासाठी मोहिम राबवली जाण्याचे सुतोवाचही त्यांनी केले आहे. 

मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी अंदाज पत्रकाच्या  किती टक्के रक्कम खर्च करणार? मराठी माध्यमाच्या बंद पडलेल्या शाळा सुरु करुन भविष्यात त्या बंद पडू नयेत यासाठी काय काळजी घेणार? असे प्रश्न जोशी यांनी राजकिय पक्षांपुढे मांडले आहेत. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकिय पक्षांनी या संदर्भातील भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन जोशी यांनी केले आहे. विद्यमान सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आश्वासित केले होते. त्यादृष्टीने काही पावले उचलली गेली नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. यासाठी पुर्ण राजकिय बळ उभे करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी मांडले. मराठी विद्यापीठ, बारावी पर्यंत मराठी भाषा सक्तीची करण्याचा विषयही जोशी यांनी मांडला.

मराठी भाषा शिक्षण कायदा, भाषा विकास प्राधिकरण, राज्य आणि विभागीय सांस्कृतिक विकास महामंडळाची स्थापना या विषयांवरही राजकिय पक्षांनी आपली भूमिका जाहिर केली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मराठी भाषिकांनी या मागण्यांवर विचार करावा असे आवाहनही जोशी यांनी केले आहे. या संदर्भात जागृती करण्यासाठी लवकरच साहित्य संस्कृती क्षेत्रातील काही मान्यवर व्यक्ती तसेच संस्था एक मोहिम हाती घेणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com