सुनिश्चित प्लॅनिंग करून आर आर पाटलांनी राज ठाकरेंची अटक घडवून आणलेली Raj Thackeray Arrest | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरे आर आर पाटील

२००८ साली प्लॅनिंग करून आर आर पाटलांनी राज ठाकरेंची अटक घडवून आणलेली; जाणून घ्या

सध्या मशिदीवरच्या भोंग्याचा मुद्दा महाराष्ट्रात तापलाय. काल औरंगाबादमध्ये जाहीर सभा पार पडल्यानंतर राज ठाकरेंनी यासंबंधी केलेलं वक्तव्य भोवणार असल्याची शक्यता आहे. याआधी ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. दोन समुहांमध्ये भांडण लावल्याचा आरोप ठाकरेंवर करण्यात आलाय. तसेच प्रक्षोभक वक्तव्य करणे, अटींचं उल्लंघन करणे यानुसार राज ठाकरे यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

पण हे पहिल्यांदा घडलेलं नाही. यापूर्वी देखील राज ठाकरे यांच्यावर असा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांना अटक देखील झाली होती.

९ मार्च २००६ साली शिवसेनेत बंडखोरी केलेल्या राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. हा नवा पक्ष मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आपली जम बसवण्यासाठी चाचपडत होता. मनसेची स्थापना करताना राज ठाकरेंनी आपलं उद्दिष्ट जाहीर केलं होतं, ते होत मराठी माणसावर होणारा अन्याय रोखणे. याच मराठी अस्मितेवर त्यांनी पहिलं मोठं आंदोलन छेडलं ते २००८ साली.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये मुंबईमध्ये येणाऱ्या लोंढ्यांवर लक्ष वेधले, मुंबई अगोदरच बकाल झाली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल, असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेशी व बिहारी लोकांवर आपला शाब्दिक हल्ला चढवला. त्या राज्यांच्या नाकर्तेपणाचा महाराष्ट्रातील जनतेने का भुर्दंड भ‍रावा? असा प्रश्न करत तेथील राजकारण्यांवर टीका केली.

हेही वाचा: राज ठाकरेंवर आज कारवाई होणार? मनसेची संतप्त प्रतिक्रिया

राज ठाकरेंवर गुन्हा; वसंत मोरे तिरुपती बालाजीला रवाना३ फेब्रुवारी २००८ रोजी मनसेचे कार्यकर्ते व समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते यांच्यात संघर्षाची ठिणगी उडाली. राज ठाकरेंच्या भाषणांना समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे देऊन उत्तरे दिली. राज ठाकरे यांनी दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यावरही टीकास्त्र सोडले. सामाजिक कार्यासाठी ते आपले मूळ राज्याचीच निवड करतात व ज्या राज्यात त्यांची कारकीर्द घडली त्या राज्यात सामाजिक कार्य करताना हात आखडता घेतात. या वेळेस मुंबईतील अनेक टॅक्सींची तोडफोड करण्यात आली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या रस्त्यावर धुमाकूळ घातला.

महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढला. त्यावेळी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडी सरकार होते. मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख तर उपमुख्यमंत्री होते आर आर पाटील. त्यांच्याकडेच गृहमंत्रालयाची जबाबदारी देखील देण्यात आली होती. केंद्रात देखील काँग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते. त्यांना पाठिंबा असलेल्या उत्तर प्रदेश बिहार मधल्या पक्षांनी राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली होती. अखेर मनसे आणि समाजवादी पक्षाच्या आंदोलनाला चाप लावायची जबाबदारी आर आर पाटलांनी आपल्या शिरावर घेतली.

मुंबईत आंदोलने सुरु झाले होते तेव्हा आर आर पाटील हे विदर्भ दौऱ्यावर होते. त्यांनी नागपूरमध्येच पोलीस खात्याच्या बड्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली. जवळपास दोन दिवस राज ठाकरेंची व समाजवादी नेते अबू आझमी यांची अटक करावी कि नाही याबद्दल चर्चा करण्यात आली. मनसे विरुद्ध समाजवादी हे आंदोलन चिघळत चालले होते.काही पोलीस अधिकाऱ्यांचं मत होतं की या दोन्ही नेत्यांची अटक झाली तर मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. सर्वसामान्य व्यक्तींच्या जीविताला व मालमत्तेला धोका होण्याची जास्त शक्यता होती. यामुळे आर आर पाटील यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला होता. त्यातच महाराष्ट्रात राष्ट्रपती व पंतप्रधान यांचा दौरा होणार होता. अनेक पोलीस कर्मचारी व्हीआयपी सुरक्षिततेच्या कामात व्यस्त असणार होते.

हेही वाचा: राज ठाकरेंवर गुन्हा; वसंत मोरे तिरुपती बालाजीला रवाना

Raj thacekray arrest 2008

Raj thacekray arrest 2008

राज ठाकरेंवर गुन्हा; वसंत मोरे तिरुपती बालाजीला रवानापण जेव्हा मुंबईत टॅक्सींची तोडफोड सुरु झाली तेव्हा गृहमंत्र्यांनी हे आंदोलन कठोरपणे मोडून काढायचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्वप्रथम राज ठाकरे व अबू आझमी यांची अटक करायचं ठरलं. टॅक्सीवर झालेल्या हल्ल्याचे व्हिडीओ क्लिपिंग घेण्यात आले. सरकारी वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेण्यात आला. मुंबईतील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. सर्व जय्यत तयारी झाली होती. प्रशासनात असलेल्या उत्तर भारतीय लॉबीने ही अटक लवकर घडावी यासाठी जोर लावला होता.

विदर्भ दौऱ्यावर असलेले आर.आर.पाटील पहिल्या फ्लाईटने मुंबईला आले. आल्या आल्या त्यांनी एअरपोर्टवरून थेट मंत्रालयाकडे मोर्चा वळवला. तिथे गृहखात्याचे व पोलीस डिपार्टमेंटचे सर्वोच्च अधिकारी हजर होते. जवळपास पंचवीस मिनिटे मिटिंग चालली. सर्वप्रथम राज ठाकरे व अबू आझमी यांची सुरक्षाव्यवस्था निम्मी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आर आर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की,

"सध्या या नेत्यांपेक्षा सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेची काळजी मला जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना परत बोलवण्यात आलं आहे."

कितीही पॉप्युलर व मोठा नेता असला तरी कायदा व सुव्यवस्थेपेक्षा मोठा कोणीही नाही हे आर आर पाटलांना दाखवून द्यायचं होतं. दंगलीचे आरोप असणाऱ्या हजार मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी आर आर पाटलांनी अटकेच्या निर्णयावर सही केली आणि दोन दिवसा पासून वाट पाहणारी पोलीस व्हॅन राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील कृष्ण कुंज या निवासस्थानाकडे रवाना झाली. रस्त्यात जागोजागी पोलीस कमांडो उभे होते.

साधारण पांढरा शर्ट व निळा स्वेटर या साध्या वेशात असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे शांतपणे पोलिसांच्या गाडीत जाऊन बसले. मनसे कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करण्यात आलं होतं. राज ठाकरे यांना विक्रोळी येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यांना मॅजिस्ट्रेट पुढे उभं करण्यात आलं. याच वेळी समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना देखील अटक करण्यात आली होती.

सरकारी वकील अशोक भोसले यांनी पोलिसांची बाजू मांडली. राज ठाकरे यांच्या द्वेषपूर्ण भाषणांनी मुंबईतील शांततेला धोका निर्माण झाला व दंगली पेटल्या असल्याचे आरोप करण्यात आले. तर राज ठाकरेंचा बचाव करणारे वकील अशोक मुंदर्गी यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियावर दंगलीचे खापर फोडले. टीव्हीवरील बातम्यांनी राज ठाकरेंच्या भाषणाची तोडफोड करणारे क्लिपिंग दाखवले व यातून मुंबईत मराठी तरुणांची माथी भडकली असल्याचा आरोप त्यांनी केला.

मॅजिस्ट्रेट एस.जे.शर्मा यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्यांनी राज ठाकरेंना भडकावू भाषण करण्यावरून खडसावले आणि १५ हजार रुपये जामिनावर त्यांची सुटका केली. जवळपास दोन तास अटकेत असलेले राज ठाकरे सुखरूपपणे बाहेर आले. कोणतीही अनुचित घटना न घडता सुव्यवस्था सांभाळणाऱ्या आर आर पाटलांनी कोणताही नेता कायद्यापेक्षा मोठा नाही हे दाखवून दिलं.

Web Title: How R R Patil Planned Executed Raj Thackerays Arrest In 2008

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top