बारावीचा पेपर फुटल्याची अफवाच !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

नवी मुंबई - बारावीचा मराठीचा पेपर फुटला, ही अफवा आहे. त्यामुळे तो पुन्हा घेण्याचा प्रश्‍नच नाही, असे स्पष्टीकरण उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी (ता. 3) केले.

नवी मुंबई - बारावीचा मराठीचा पेपर फुटला, ही अफवा आहे. त्यामुळे तो पुन्हा घेण्याचा प्रश्‍नच नाही, असे स्पष्टीकरण उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी (ता. 3) केले.

बारावीचा गुरुवारचा (ता.2) मराठीचा पेपर फुटल्याची अफवा सोशल साईटवर पसरली होती. काही सोशल साईट्‌सवर मराठीच्या प्रश्‍नपत्रिकेचे छायाचित्रही व्हायरल झाल्याची चर्चा होती. त्यामुळे मराठीचा पेपर पुन्हा द्यावा लागतो की काय, अशी भीती विद्यार्थ्यांना होती. मात्र पेपर फुटला नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी प्रश्‍नपत्रिका वाचण्यास दिली जाते. त्याच वेळी एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्‍नपत्रिकेचे छायाचित्र मोबाईलमध्ये घेऊन सोशल साईट्‌सवर व्हायरल केले असावे. त्यावेळी त्याच्या मोबाईलमधील घड्याळ दहा मिनिटे मागे असल्याने सोशल साईट्‌सवर व्हायरल झालेल्या छायाचित्रातील वेळही दहा मिनिटे आधीची असावी. त्याचा अर्थ मराठीचा पेपर फुटला असा होत नाही, असे शिक्षण मंडळाचे म्हणणे आहे. दरम्यान, याप्रकरणी शिक्षण मंडळाने वाशी पोलिस ठाण्यात अनोळखी विद्यार्थ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: HSC paper leakage rumor!