वांद्रे स्थानकाबाहेर पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा.. मजुरांची प्रचंड गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

वांद्रे टर्मिनसबाहेर पुन्हा एकदा लॉकडाऊनदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्याचं चित्र पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडल्याचं बोललं जात आहे.

मुंबई: वांद्रे टर्मिनसबाहेर पुन्हा एकदा लॉकडाऊनदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्याचं चित्र पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडल्याचं बोललं जात आहे.

मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर पुन्हा एकदा हजारो मजुरांनी गर्दी केली होती. मुंबईमध्ये अडकलेल्या अनेक कामगार, मजूर आणि विद्यार्थ्यांनी ट्रेन गेल्यानंतर गर्दी केली. या स्थानकावरुन उत्तरप्रदेश आणि बिहारला जाणारी ट्रेन सुटणार असल्याचं सांगितल्यानंतर ही गर्दी झाल्याचं बोललं जात आहेत.

हेही वाचा: कोरोना संसर्गाची व्याप्ती समजून घेण्यासाठी होणार 'सिरो-सर्व्हे'; जाणून घ्या  'सिरो-सर्व्हे' म्हणजे काय?
 

सकाळी ११ च्या सुमारास वांद्रे पूर्वेकडील टर्मिनसबाहेर हजारो परप्रांतिय मजुरांनी पुन्हा एकत्र येऊन गर्दी केली. हे सर्व मजूर वांद्रे टर्मिनसच्या दिशेने धावत जात असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. आज संध्याकाळी ४ वाजता उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणारी ट्रेन सोडली जाणार आहे, असे काहीजण सांगत आहेत. या व्हिडीओत चलते रहो, चलते रहो असा आवाजही ऐकायला येत आहे. वृत्तसंस्था एएनआयनं या संबंधिताचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

वांद्रे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि ही गर्दी नियंत्रणात आणली. ही गर्दी नेमकी का जमली होती, वांद्रे स्थानकावरुन ट्रेन सोडण्यात येणार होती का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मजूरांना सोमवारी रेल्वे जाणार असल्याचं फोन करून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांनी वांद्रे स्थानकावर गर्दी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

हेही वाचा: ऑनलाईन दारू मागवताय; एकाची अशी झाली ५० हजारांची फसवणूक..वाचा बातमी

हे सर्व प्रवासी मजूर उत्तर प्रदेश आणि बिहारचे आहेत. आपल्याला स्थानिक पोलिस स्टेशनमधून रेल्वे जाणार असल्याचा फोन आला होता असं मजूरांचं म्हणणं आहे. तर काही मजुरांनी टोकन क्रमांक मिळाला असल्याचाही दावा केला आहे. सोमवारी  आम्हाला दोन फोन आणि मेसेजेस आले. वांद्रे स्थानकावरून आमच्यासाठी खास गाड्या चालवल्या जाणार असल्याचं या फोनमध्ये सांगण्यात आलं होतं, असं या मजुरांनी सांगितलं आहे. 
 

१४ एप्रिलला ही जमली होती गर्दी:

१४ एप्रिलला देशभरासाठी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला गेल्यानंतर लगेचच संध्याकाळी वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर हजारो परप्रांतीय मजुरांनी केली होती. दुपारी ४ वाजल्यानंतर हजारो मजुरांनी गर्दी झाली होती. त्यावेळीही या ठिकाणी सोशल डिस्टसिंगचा बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे किमान लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू होतील आणि आपल्याला गावी परतता येईल अशी आशा प्रत्येक कामगाराच्या त्यावेळी मनात होती. पण अचानक लॉकडाऊन वाढल्यामुळे अनेकांची निराशा निर्माण झाली होती. त्यानंतर त्याचे पडसाद वांद्रे स्थानकाबाहेर पडसाद उमटलेले पाहायला मिळाले होते.

huge crowd had been seen again at bandra station today read full story   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: huge crowd had been seen again at bandra station today read full story