निवडणूक आयोगाच्या ऍपना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

vigil
vigil

मुंबई, ता. 16 : निवडणूक यंत्रणाही डिजिटायझेशनच्या स्पर्धेत उतरली असून, विविध सेवा एका क्‍लिकवर उपलब्ध करून दिल्या जात आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आणलेल्या "सी-व्हिजिल' "एनजीआरएस सिटीझन' आणि "पीडब्लूडी' या तीन ऑनलाईन ऍपना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता मुंबई उपनगर जिल्ह्यात अपंगांसह सर्व नागरिकांना मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात आली आहेत. 

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी "सी-व्हिजिल' ऍप विकसित केले असून, त्याद्वारे नागरिक आपली ओळख उघड न करता गैरप्रकारांबाबत आयोगाला माहिती देऊ शकतात. उमेदवार, राजकीय पक्ष किंवा त्यांच्या समर्थकांनी निवडणूक प्रचारात नियमांचे किंवा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास या ऍपद्वारे तक्रार नोंदवता येईल. संबंधित घटनेचे छायाचित्र अथवा व्हिडीओ तक्रारीचा पुरावा म्हणून वापरता येणार आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. 

या ऍपद्वारे आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेतली जात असून, त्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यरत आहे. आतापर्यंत ऍपद्वारे 80 तक्रारी आल्या; त्यापैकी 57 तक्रारींवर कारवाई करण्यात आली. तथ्य न आढल्यामुळे 23 तक्रारी रद्द केल्या, असे त्यांनी सांगितले. भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या राष्ट्रीय तक्रार निवारण यंत्रणा (एनजीआरएस) या ऍपद्वारे आतापर्यंत 12 हजार 90 तक्रारी विशेष कक्षाकडे आल्या आहेत. त्यापैकी तथ्य न आढळलेल्या 11 हजार 624 तक्रारी बंद केल्या असून इतरांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

मतदान केंद्रे तळमजल्यावर 
मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 मतदारसंघात एकूण 7397 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी 1973 मतदान केंद्रे पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर आहेत. मतदारांच्या सोईसाठी त्यापैकी 1503 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली आहेत. इमारतींमध्ये उद्‌वाहनाची सोय असल्याने उर्वरित 467 मतदान केंद्रे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरच असतील. 

अपंग मतदारांसाठी "पीडब्ल्यूडी' ऍप 
निवडणूक आयोगाने अपंगांसाठी पर्सन्स विथ डिसएबिलिटीज (पीडब्ल्यूडी) ऍप कार्यान्वित केले आहे. उपनगरातील अपंग मतदार व त्यांच्या कुटुंबीयांनी या ऍपवर नोंदणी केल्यानंतर मतदानाच्या दिवशी क्र. "513' वाहनाची मोफत व्यवस्था केली जाणार आहे. या ऍपवर निवडणूक अधिकारी व मतदान केंद्रांची माहिती उपलब्ध आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. मुंबई उपनगरातील 26 मतदारसंघांत एकूण 7771 अपंग मतदार आहेत. त्यांच्यासाठी 2030 प्रशिक्षित स्वयंसेवक नियुक्त केले असून, 990 व्हीलचेअर व मतदान केंद्रांत रॅम्प आदी सुविधा दिल्या जातील. अपंगांच्या मदतीसाठी मतदान केंद्रांवर स्वतंत्र कक्ष स्थापन केले जाणार आहेत. स्वयंसेवक लोकलमधील अपंगांच्या डब्यात जाऊन त्यांच्या अडचणींबाबत माहिती घेत आहेत; तसेच मतदानाविषयी जनजागृती करत आहेत, असे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com