शपथविधीच्या ग्रँड सोहळासाठी शिवाजी पार्कला पोलिसांचे सुरक्षा कवच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याचा स्थानिक बंदोबस्त, सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस बल, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, मुंबई वाहतूक विभाग आणि जवळपास 2 हजार अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

मुंबई  : राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात भाजपाविरोधी महाराष्ट्र विकास आघाडीने बाजी मारल्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. दादर येथील शिवाजी पार्क मैदानात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असून या सोहळ्यासाठी प्रशासनासोबतच शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही जय्यत तयारी केल्याचं दिसून येत आहे. या ग्रँड सोहळ्यास अनेक ज्येष्ठ मान्यवरांची उपस्थिती असून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून 1500 ते 2000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी माहिती दिली.

या शपथविधी सोहळ्यास सर्व राजकीय पक्षांचे मान्यवर, पदाधिकारी, खासदार, आमदार आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामान्य जनता तसेच मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते असा जनसमुदाय उपस्थित राहणार आहेत. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांतर्फे चोख बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आले आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याचा स्थानिक बंदोबस्त, सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस बल, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, मुंबई वाहतूक विभाग आणि जवळपास 2 हजार अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच सध्या वेशातील पोळी पथक सतर्क गस्त देखील ठेवण्यात आली आहे. वाहतूक शाखेकडून रहदारी योग्यरीत्या नियंत्रित केली जाणार आहे.

Webtitle : huge security around shivaji park as Uddhav Thackeray to take oath as CM


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: huge security around shivaji park as Uddhav Thackeray to take oath as CM