शंभर झाडे कोसळली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

नवी मुंबई - काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे नवी मुंबईत जवळपास शंभर झाडे कोसळली आहेत. १ ते ९ जून या अवघ्या नऊ दिवसांत तब्बल १०१ झाडे कोसळण्याच्या घटनांची नोंद महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली आहे. यंदा उशिराने सुरू झालेली वृक्षछाटणी व काँक्रीटीकरणामुळे या घटना घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

नवी मुंबई - काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे नवी मुंबईत जवळपास शंभर झाडे कोसळली आहेत. १ ते ९ जून या अवघ्या नऊ दिवसांत तब्बल १०१ झाडे कोसळण्याच्या घटनांची नोंद महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली आहे. यंदा उशिराने सुरू झालेली वृक्षछाटणी व काँक्रीटीकरणामुळे या घटना घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

शहरात मोठ्या प्रमाणात झाडे असल्याने व सर्वाधिक उद्याने असल्याने ‘ग्रीन सिटी’ असा नावलौकिक नवी मुंबईचा आहे. मात्र नैसर्गिक आपत्ती व शहरीकरणाच्या बेसुमार वेगाने पावसाळ्यात झाडे कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात तब्बल ३०० झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या असताना यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात झाडे कोसळण्याच्या घटनांनी शंभरी ओलांडली आहे. 

नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, घणसोली या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असून सर्वाधिक झाडे एकट्या वाशी विभागात कोसळली आहेत. झाडे कोसळण्याच्या घटनांना वाढते काँक्रीटीकरण जरी कारण सांगितले जात असले, तरी सार्वजनिक जागा वगळता खासगी जागांमधील झाडे वाचवण्यासाठी पालिकेने केलेले प्रयत्न तोकडे पडल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. 

शनिवारी १३८ एमएम पाऊस
कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार ९ जूनच्या मध्यरात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात १३८ मि.मी. इतक्‍या पावसाची नोंद झाली. यात १५ ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या. १५ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. मात्र त्याचा परिणाम जनजीवनावर झाला नाही.  

जीपवर झाडांच्या फांद्या कोसळल्या 
बेलापूर (बातमीदार) : मॉन्सूनपूर्व कामे करताना धोकादायक झाडांच्या छाटणीची कामे पूर्ण झाली नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. शनिवारी पहाटे सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे नेरूळ आणि जुईनगर परिसरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. यातील काही रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांवरही पडल्याने त्यांचे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्या. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तेव्हा पालिकेने धोकादायक झाडांची छाटणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आठही विभागांमध्ये झाडांच्या छाटणींचे नियोजन करून दिले आहे. अनेक ठिकाणी झाडेछाटणीचे काम सुरू आहे. सहा लॅडर व्हॅनच्या मदतीने वृक्षछाटणी सुरू आहे. विद्युत विभागाच्या दोन लॅडर व्हॅनही छाटणीसाठी घेतल्या आहेत. झाडे जुनी झाली असून त्यांच्या मुळावर मातीचे प्रमाण कमी असल्याने ती कोसळत आहेत.  
- नितीन काळे, उपायुक्त, उद्यान विभाग 

Web Title: hundred trees Collapsed in mumbai