पत्नी झोपेत असताना पतीकडून लाकडाने प्राणघातक हल्ला; हॉस्पिटलमध्ये सोडून गेला निघून | Bhiwandi Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Bhiwandi Crime : पत्नी झोपेत असताना पतीकडून लाकडाने प्राणघातक हल्ला; हॉस्पिटलमध्ये सोडून गेला निघून

भिवंडी : पत्नी झोपेत असतान तिच्या नवऱ्याकडून तिच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सदर पीडितेच्या भावाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण पोलिसांनी दबावाखाली येऊन आरोपीवर भादंवि कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल न करता ३२६, ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याचा आरोप भावाने केला आहे.

अधिक माहितीनुसार, गणेश सुरेश चव्हाण असं तक्रारदाराचे नाव असून त्यांची बहीण सपना (वय ३९) हिचा विवाह २००७ साली झाला होता. तर तिचा पती असलेल्या प्रकाश शंकर पाटील याने १३ मे रोजी मध्यरात्री झोपेत असताना प्राणघातक हल्ला केला. लाकडाने बेदम मारहाण केल्यामुळे सपना रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. हा प्रकार पाहून शेजाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि सासू, नणंदेच्या मदतीने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास सपनाचा भाऊ गणेश याला अज्ञात व्यक्तीने तुझ्या बहिणीवर सासरच्यांकडून मारहाण झाल्याचे कळाले. त्यानंतर गणेशने हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. पण गणेश आल्यानंतर सासरच्या मंडळींना हॉस्पिटलमधून काढता पाय घेतला. हॉस्पिटलचे बील आम्ही भरतो असं सांगून ते निघून गेले पण त्यांनी बील भरलं नसल्याचा आरोप तक्रारदार गणेशने केला आहे. त्यानंतर गणेशने पोलिसांत तक्रार दिली आहे.

सपनावर प्राणघातक हल्ला करूनही पोलिसांनी ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप गणेशने केला आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. सध्या सपनावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांकडून मारहाणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करून कलम लावण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.