चारित्र्याच्या संशयावरून मुलीसमोरच पतीने घोटला पत्नीचा गळा

दिनेश गोगी
रविवार, 7 एप्रिल 2019

चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या मुलीसमोरच पत्नीचा गळा घोटून केला खून

उल्हासनगर : चारित्र्याच्या संशयामुळे पतीने आपल्या मुलीसमोरच पत्नीचा गळा घोटून खून केल्याची संतापजनक घटना उल्हासनगरात घडली. मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन पित्याची तक्रार केल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

कॅम्प नंबर 1 मधील मुकुंद नगरात दीपक पगारे,त्याची पत्नी रेखा पगारे हे त्यांच्या मुलगा व मुलगी सोबत गुण्यागोविंदाने राहत असत. दीपक हा प्लंबरचे काम करतो. मुलगा इयत्ता नववीमध्ये व मुलगी आठवीत शिक्षण घेत आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची कमतरता भासू नये, म्हणून रेखा धुणीभांडीची काम करू लागली. मात्र, दीपक तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यावरून अनेकदा भांडणे देखील झाली. काल सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास रेखा धुणीभांडी करून घरी आली. दीपकही देखील घरी आला. त्यावेळी त्यांची मुलगी प्रतिक्षा घरीच होती. तर मुलगा बाहेर गेला होता. तेव्हा तू कामाला का जातेस?अशी विचारणा दीपकने रेखाकडे केली. त्यानंतर दोघांमध्ये भांडणं सुरू झाली.

दीपक उघडपणे तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. ही नेहमीची भांडण असल्याचा विचार करून प्रतिक्षाने तिच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केले. तितक्यात दीपकने रेखाला ठोशाबुक्यांनी मारहाण करून ओढणीने गळा आवळून तिचा खून केला.

प्रतिक्षाने थेट उल्हासनगर पोलिस ठाणे गाठले. पित्याची तक्रार दिल्यावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील जावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजू सावंत यांनी दीपकला अटक केली असून, उद्या सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Web Title: Husband Killed his Wife Doubt on Her Character in Ulhasnagar