मला लाज वाटली; महेश मांजरेकरांचा संताप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

हुकूमशाहासाठी जनतेने 'नंदकिशोर सर्व शक्तिमान, तुमच्यासमोर झुकवतो मान' हा जयघोषही तयार केला आहे. सर्व स्पर्धकांना गुडघे टेकून त्याच्यासमोर बसावं लागतं आणि त्याच्या आदेशाचं पालन करावं लागतं.

मुंबई - 'मराठी बिग बॉस' चांगलच गाजतंय ते म्हणजे तिथल्या विचित्र घडामोडींमुळे. घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आलेला स्पर्धक नंदकिशोर चौगुले याने मेघा धाडेला चक्क बुटावर नाक घासायला लावलं आहे. बिग बॉसचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी बिग बॉसचा कालचा (मंगळवार) भाग संपल्यानंतर 'आज मला लाज वाटत आहे' असं ट्वीट केलं आहे.
 

'हुकूमशाह' या साप्ताहिक टास्कसाठी बिग बॉसने नंदकिशोरला हुकूमशाहाचे पद बहाल केले आहे. त्याला विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत. या टास्कमध्ये तो हुकुमशाह म्हणून जे कार्य करायला सांगेल ते कार्य घरातील इतर स्पर्धकांना कारावेच लागणार आहे. हुकूमशाह देईल तो आदेश मान्य करणं जनतेला सक्तीचे आहे.

हुकूमशाहासाठी जनतेने 'नंदकिशोर सर्व शक्तिमान, तुमच्यासमोर झुकवतो मान' हा जयघोषही तयार केला आहे. सर्व स्पर्धकांना गुडघे टेकून त्याच्यासमोर बसावं लागतं आणि त्याच्या आदेशाचं पालन करावं लागतं. या हुकुमशाहने आस्ताद काळेला आपला रक्षक नेमला आहे तर स्मिता गोंदकर त्याची सेविका आहे.

nandakishor chaugule

उषा नाडकर्णी यांची हेटाळणी करण्यावरुन पुष्कर जोग, सई लोकूर, मेघा धाडे, शर्मिष्ठा राऊत यांच्यासोबत नंदकिशोरचे खटके उडाले होते. पुष्कर आणि नंदकिशोर यांच्यामध्ये तर वारंवार वाद होतात. सोमवारी झालेल्या नॉमिनेशन कार्यात सईने नंदकिशोरला नॉमिनेट केलं होतं. त्यामुळे हुकूमशाह टास्कमध्ये नंदकिशोर याचा वचपा काढणार, याची खात्री पुष्कर, मेघा, सई, शर्मिष्ठा या चौघांना होती. घरातील सर्व स्पर्धकांचे कपडे धुण्याचे आदेश मेघाला दिले. इतकेच नाही तर ते कपडे अंगावरच सुकवण्याचीही आज्ञा दिली. नंदकिशोरसाठी खास तयार करण्यात आलेल्या रुमबाहेर रात्रभर पहारा देण्याचे आदेश पुष्कर आणि रेशम यांना देण्यात आले. 

हुकूमशाहाच्या वेशात येताच नंदकिशोरने सगळ्यांना फर्मान सोडायला सुरवात केली. सई लाडावलेली असून घरात राहण्यास अपात्र आहे, मेघाने सात लाख रुपयांचे कपडे खरेदी केले, पुष्करला बाहेर माठ अॅक्टर म्हटलं जातं, असे आरोप त्याने हा टास्क सुरु होण्यापुर्वी कॅमेरासमोर केले.

नंदकिशोरने सर्वांना आपल्यासमोर मान वाकवून अनेक वेळा स्वतःच्या नावाचा जयघोष करायला लावला, तसंच लॉनमध्ये चालता-चालता उड्या मारण्यासही भाग पाडलं. इतकंच काय, तर खाणं, पाणी पिणं आणि वॉशरुम वापरणं यासाठीही नंदकिशोरची परवानगी घ्यावी लागत आहे. प्रत्येक स्पर्धकाकडून त्यांच्या आवडीची वस्तू कर स्वरुपात घेऊन त्यांना खाण्या-पिण्याची संमती दिली जात आहे. आऊंना होणारा दम्याचा त्रास आणि वयोमान यामुळे त्यांना काही बाबतीत सूट देण्यात आली आहे. महिलांविषयी नंदकिशोरच्या वर्तनामुळे महेश मांजरेकर यांनी संताप व्यक्त केलाच पण त्यांच्या ट्विट नंतर प्रेक्षकांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: I am ashamed today says mahesh manjrekar