गणेश नाईकांच्या आशीर्वादामुळेच मी 'भाजप'मध्ये : संदीप नाईक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

संदीप नाईक यांनी त्यांचा चुलत भाऊ सागर नाईक आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (बुधवारी) भाजपमध्ये प्रवेश केला.

नवी मुंबई : 'माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आशीर्वाद आणि खंबीर पाठींब्यामुळेच माझा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय सोपा झाला. आमच्या कुटुंबांत मला आणि सागरला निर्णय घेण्याचे गणेश नाईकांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच मला एवढा मोठा निर्णय सहज घेता आले,' असे उद्गार संदीप नाईक यांनी 'सकाळ'शी बोलताना काढले.

संदीप नाईक यांनी त्यांचा चुलत भाऊ सागर नाईक आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (बुधवारी) भाजपमध्ये प्रवेश केला. देशात बदलत असलेल्या परिस्थितीनुसार आपली भूमिका न बदलल्याने शहराचे नुकसान होऊ नये, म्हणून आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण नाईक यांनी दिले. 

मुंबईतील गरवारे सभागृहात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पहिल्यांदाच संदीप नाईक यांनी 'सकाळ'शी बोलताना गेले दोन दिवसांपासून बाळगलेले मौन सोडले. 'मी आधीच दोनवेळा आमदार म्हणून निवडून आल्यामुळे मला राज्यात आणि देशात ओळखतात. त्यामुळे मला स्वतःला खूप काही मोठे होण्यासाठी मी हा निर्णय घेतला असे नाही. आजपर्यंत नवी मुंबईतील नागरिकांकडून जे प्रेम मला मिळाले आहे, त्या प्रेमावर खरे उतरायचे आहे. शहरातील उरलेली कामे पूर्णत्वास न्यायची आहेत. चांगले प्रकल्प शहरात आणायचे आहेत. शहराचा जो नावलौकीक आजपर्यंत आहे. शहराचे वेगळेपण राज्यात आणि देशात आहे ते वाढवायचे आहे,' असे मत संदीप नाईक यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली देशाची वाटचाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक प्रतिसाद असतो. कितीही कठीण प्रश्न असेल तरी तो साधा व सोपा करून समाजातील प्रत्येक घटकांना दिलासा देण्याची त्यांची कार्यपद्धती ही नवी मुंबईच्या विकासासाठी मला पूरक वाटल्याने आता भाजपमध्ये काम करणे सोपे जाईल, असा विश्‍वास नाईक यांनी व्यक्त केला.

तसेच भाजपमध्ये राहून नवी मुंबईतील सर्वसमावेशक गावे, झोपडपट्टी व शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आपली तयारी असल्याचे संदीप नाईक यांनी सांगितले. 2014 ला मी गणेश नाईकांच्या विचाराने नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसारच विधानसभा निवडणूक लढली. मला यात यश मिळाले. नंतर गणेश नाईकांच्या विचाराने आम्ही महापालिका निवडणूक लढली.

यातही आम्ही 52 नगरसेवक व 5 अपक्ष नगरसेवक निवडूण आणू शकलो. म्हणजे आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केले; परंतु, आता देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. यात आपले शहर कुठे मागे पडू नये. तसेच आपली राजकीय भूमिका न बदलता आपल्या शहराला वेठीस धरले जाऊ नये. असे भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आपल्यावर होत असलेल्या टीकेला प्रत्युतर देताना संदीप नाईक यांनी स्पष्टीकरण दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I am in BJP because of the blessings of Ganesh Naik says Sandeep Naik