सामान्य 'आरटीआय' कार्यकर्ता कसा बनला कोट्यधीश?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नालासोपारा येथील प्रगती नगरमध्ये गावडे यांच्या मोटारीच्या डिक्कीमध्ये गुरुवारी जुन्या एक कोटी 11 लाख रुपयांच्या नोटा तसेच 40 लाख रुपयांच्या नव्या चलनातील नोटा सापडल्या. गावडे यांच्यासह वाहन चालकालाही हा पैसा आणला कुठून याची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.

मुंबई - पालघर जिल्ह्याचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आणि वसई विरार महापालिकेतील गटनेते नगरसेवक धनंजय गावडे यांच्याकडे सापडलेल्या नोटांची प्राप्तीकर विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. राजकारणात सक्रीय होताना 'आरटीआय' कार्यकर्ता म्हणून माहिती मागवून अनेक बांधकाम व्यावसायिकांसह व्यापाऱ्यांकडून त्यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक माया गोळा केली असल्याची जोरदार चर्चा वसई विरार परिसरात ऐकायला मिळत आहे.

नालासोपारा येथील प्रगती नगरमध्ये गावडे यांच्या मोटारीच्या डिक्कीमध्ये गुरुवारी जुन्या एक कोटी 11 लाख रुपयांच्या नोटा तसेच 40 लाख रुपयांच्या नव्या चलनातील नोटा सापडल्या. गावडे यांच्यासह वाहन चालकालाही हा पैसा आणला कुठून याची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.

शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांच्या सारखा आक्रमक कार्यकर्ता हा मूळचा कोकणातील. नालासोपारा येथील नगसेविका छाया पाटील यांचा खंदा समर्थक म्हणून काम करताना त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. छाया पाटील या काँग्रेसमध्ये गेल्यानंतर गावडे यांनीही काँग्रेस पक्षाचे काम काही काळ केले. परंतु, छाया पाटील या बहुजन विकास आघाडीमध्ये गेल्या तर गावडे यांनी शिवसेनेत प्रवेश करुन उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी खांद्यावर घेतली. 

कोकणातील विशेषत: सिंधुदुर्ग जिल्हयातील चाकरमानी मंडळी नालासोपारा परिसरात मोठया संख्येने राहतात. वसई विरार महापालिकेतील हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची शिट्टी जोरात वाजत असली तरी, शिवसेनेला मानणाऱ्या निष्ठावान शिवसैनिकांमुळे नालासोपारा परिसरात शिवसेनेचा आवाज कायम राहिलेला आहे. त्यामुळे धनंजय गावडे हे पहिल्यांदा शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले असून वसई विरार महापालिकेत पक्षाचे गटनेते म्हणून कार्यरत आहेत. पक्षाला रसद पुरविणारा पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी अशी ओळख निर्माण झालेल्या गावडे यांना हितेंद्र ठाकूर यांचा कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाते. 

माहितीच्या अधिकारातून बेकायदा बांधकामाविरोधात पालिकेला व संबंधित बिल्डरांना त्यांच्या प्रकल्पातील त्रुटीविषयी धाक दाखवून वेठीस धरणे असे प्रकार सध्या या भागातील अनेक मंडळी करत आहेत. गावडे यांची अनेक बांधकाम व्यावसायात भागिदारी असल्याचे सांगण्यात येते. तसेच पालिकेच्या राजकारणात अनेक प्रकरणे ते बाहेर काढीत असल्याने त्यांची वेगळी दहशत असल्याचे बोलले जाते.

पश्‍चिम रेल्वेच्या मार्गावर मुंबईपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर वसलेल्या वसई -विरार - नालासोपारा या गावांमध्ये गेल्या 30 ते 35 वर्षात स्वस्त घरे मिळतात म्हणून मुंबईतील सामान्य मराठी कुटुंबांनी धाव घेतली. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदा चाळींची बांधकामे केली गेली. शासकीय जमिनीवर अतीक्रमणे करुन तसेच खोटे दस्ताऐवज बनवून झालेल्या बांधकामाची ओरड झाली. नियोजनासाठी सिडको प्राधिकरणाने बांधकाम परवानग्यांचे नियम आणले असले तरी सिडकोच्या कार्यकाळापासून शासकीय अधिकारी, राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची चर्चा होत आहे. 

वसई विरार महापालिका हद्दीत मुंबई प्रमाणेच हजारो सदनिका विक्रीसाठी तयार आहेत, त्यातच घराचे भाव चौपट पाचपट वाढल्याने सामान्य माणसांच्या आवाक्‍याबाहेर परिस्थिती गेल्याची गेल्या 10 वर्षातील स्थिती आहे. मात्र, सामान्य 'आरटीआय' कार्यकर्ता म्हणून काम करताना राजकारणात पक्षाचा झेंडा घेवून कोट्यधीश झालेल्या गावडे यांच्या आर्थिक व्यवहाराबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. राजकारणात मोठे होताना त्यांनी अनेक हितशत्रू निर्माण केले. त्यातूनच त्यांच्या खाजगी गाडीत सापडलेल्या नोटांच्या बंडलाची पक्की टिप देवून गावडेंना आता तपासाच्या चक्रव्युहात अडकवण्यात आले अशी चर्चा होते आहे. 

गावडे यांना यापुढे तपास यंत्रणेंना नीट उत्तरे देता आली नाहीत तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होउ शकते, असेही शिवसेनेच्या व अन्य पक्षांच्या गोटात बोलले जात आहे.

Web Title: I-T officials search Sena leader and two others searched from Vasai