आयसीएसई परीक्षेत मुंबईची बाजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई - द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्‍झामिनेशनच्या वतीने (आयसीएसई) घेण्यात आलेल्या आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेत पुन्हा एकदा मुंबईनेच बाजी मारली आहे. दहावी परीक्षेत देशभरात कोपरखैरणे येथील सेंट मेरी स्कूलच्या स्वयम दास याने 99.40 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर बारावीत सांताक्रूझ येथील लीलावतीबाई पोद्दार हायस्कूलचा अभिजनन चक्रबर्ती आणि फोर्ट येथील द कॅथरेडल ऍण्ड जॉन कॉनॉन स्कूलची तानसा शाह यांनी 99.50 टक्के गुण मिळवत देशात अव्वल स्थान मिळवले आहे.

दहावी परीक्षेला देशभरातून 1 लाख 83 हजार 387 विद्यार्थी बसले होते, तर बारावी परीक्षा 80 हजार 880 विद्यार्थ्यांनी दिली होती. दहावीचा निकाल 98.51 टक्के लागला आहे. त्याचप्रमाणे बारावीचा निकाल 96.21 टक्के लागला असून, या दोन्ही परीक्षेत मुलांपेक्षा मुलींनी सरस कामगिरी केली आहे.

महाराष्ट्राचा दहावीचा निकाल 99.79 टक्के लागला आहे, तर बारावीचा निकाल 98.19 टक्के लागला आहे.

Web Title: ICSE Exam Result