सोनेरी दातावरून पटली मृताची ओळख

सोनेरी दातावरून पटली मृताची ओळख

मुंबई - दादर येथील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत अशोक संपत आणि संजीव नायर यांचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला. त्यांचे संपूर्ण शरीर जळल्यामुळे दोघांची ओळख पटवणे कठीण झाले होते. संपत यांना सोनेरी मुलामा असलेला कृत्रिम दात बसवण्यात आला होता. त्यावरून फॉरेन्सिक सायन्स विभागाला त्यांची ओळख पटवण्यात यश आले, तर संजीव नायर यांची ओळख चेन आणि मनगटी घड्याळावरून पटली.

क्रिस्टल टॉवर इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर अशोक संपत यांचे वृद्ध आई-वडील राहतात. त्यांच्या दोन मुलीही आजी-आजोबांसोबत राहतात, तर नजीकच्या इमारतीत अशोक संपत पत्नीसह राहत होते. त्यांच्या मुलींनी आगीविषयी आपल्या वडिलांना माहिती दिली असता, त्यांनी आई-वडील आणि मुलींना वाचवण्यासाठी धाव घेतली. माहिती मिळताच त्यांनी आई-वडिलांना कळवले होते. 

सोळाव्या मजल्यावर जाण्यासाठी ते लिफ्टमध्ये शिरले आणि त्यांचा घात झाला. वडिलांना आगीविषयी कळवूनही ते न आल्याने मुलींनी खाली येताच त्यांनी वडिलांची शोधाशोध केली; मात्र ते न सापडल्याने आईसह त्यांनी केईएम रुग्णालयात धाव घेतली. मनावर दगड ठेवून त्यांनी शवागृहात पाऊल ठेवले. तेथे दोन मृतदेहांची ओळख पटत नव्हती. त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर चेन आणि मनगटी घड्याळावरून संजीव नायक यांची ओळख पटली. आता उरलेला मृतदेह आपल्या वडिलांचाच असल्याच्या भीतीने मुलींनी रडण्यास सुरुवात केली. अशोक यांची पत्नीही तेथे होती. ती पुन्हा पुन्हा शवागृहात चकरा मारत होती. अशोक संपत यांच्या दातावर सोनेरी मुलामा असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली. त्यानुसार त्यांचा बेल्टचा अवशेष, ओळखपत्र आणि सोनेरी मुलामा असलेला दात डॉक्‍टरांना सापडला आणि हा मृतदेह अशोक संपत यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.

मुलाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
क्रिस्टल टॉवरमधील आग दुर्घटनेनंतर मुलगा गायब असल्याचे समजताच अशोक संपत यांच्या वडिलांना धक्का बसला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com