इच्छा नसल्यास वाढदिवशीही वडिलांनी मुलीला भेटणे चुकीचे

सुनीता महामुणकर
रविवार, 14 मे 2017

घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाने केले स्पष्ट
मुंबई - जन्मदात्या वडिलांना भेटण्याची अल्पवयीन मुलीची इच्छा नसेल, तर तिच्या इच्छेचा आदर करून वडिलांना तिला तिच्या वाढदिवसालाही भेटता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाने केले स्पष्ट
मुंबई - जन्मदात्या वडिलांना भेटण्याची अल्पवयीन मुलीची इच्छा नसेल, तर तिच्या इच्छेचा आदर करून वडिलांना तिला तिच्या वाढदिवसालाही भेटता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

परदेशात राहणाऱ्या उच्चशिक्षित वडिलांनी स्वतःच्या मुलीला तिच्या वाढदिवशी थोडा वेळ भेटण्याची परवानगी उच्च न्यायालयाकडे याचिकेद्वारे मागितली होती. त्यांच्या आणि पत्नीच्या घटस्फोटाची कार्यवाही न्यायालयात सुरू आहे. शाळेत असणाऱ्या मुलीला सुटीत 10-12 दिवस स्वतःबरोबर राहण्याची आणि तिच्या वाढदिवसाला काही वेळ तिला भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. या याचिकेवर न्या. अनुप मोहता आणि न्या. आर. व्ही. घुगे यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. मुलीला वाढदिवसाला भेटण्याची परवानगी आईने मान्य केली होती; मात्र याबाबत मुलीचेही मत महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट करत खंडपीठाने मुलीबरोबर स्वतंत्रपणे दालनात चौकशी केली. मुलीने वडिलांबरोबरचे काही अनुभव या चर्चेत मांडले आणि वडिलांना भेटण्याची इच्छा नसल्याचे खंडपीठापुढे स्पष्ट केले. न्यायालयाने याची माहिती दोन्ही पक्षकारांना दिली.

मुलगी स्वतःच वडिलांबरोबर वेळ घालवण्यास किंवा त्यांच्याकडे सुटीत जाण्यास तयार नसेल तर तिला भेटण्याची परवानगी वडिलांना मिळणार नाही, असे न्यायालयाने सांगितले. मुलगी आणि तिचे आई-वडील यांच्या नातेसंबंधांमधील तणाव कमी व्हावा, यासाठी समुपदेशन करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. समुपदेशनामार्फत त्यांच्यातील तणाव निवळून संबंध किमान सुरळीत होतील का, याची चाचपणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. मुलीच्या भविष्यासाठी वडील आणि आईने या समुपदेशनासाठी होकार दिला आहे.

Web Title: If you do not wish to meet the girl on the birthday itself, it is wrong