अहवाल रखडल्याने ठेकेदार मोकाट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

भिवंडी - मुदतीपूर्वीच खराब झालेल्या भिवंडीतील अंजूरफाटा ते बागेफिरदोस मशीद वंजारपट्टी नाक्‍याच्या मुख्य रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी राज्य सरकारच्या आयआयटीमार्फत झाली होती. यासाठी आयआयटीला दोन महिन्यांपूर्वी पालिकेने 16 लाख रुपये फी-स्वरूपात अदाही केले आहेत. मात्र या तपासणीचा अहवाल देण्यास आयआयटीकडून टाळाटाळ होत असल्याने ठेकेदारावरील कारवाई रखडली आहे. 

भिवंडी - मुदतीपूर्वीच खराब झालेल्या भिवंडीतील अंजूरफाटा ते बागेफिरदोस मशीद वंजारपट्टी नाक्‍याच्या मुख्य रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी राज्य सरकारच्या आयआयटीमार्फत झाली होती. यासाठी आयआयटीला दोन महिन्यांपूर्वी पालिकेने 16 लाख रुपये फी-स्वरूपात अदाही केले आहेत. मात्र या तपासणीचा अहवाल देण्यास आयआयटीकडून टाळाटाळ होत असल्याने ठेकेदारावरील कारवाई रखडली आहे. 

भिवंडी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या 14 व्या वित्त आयोग निधीतून सन 2016-17 या आर्थिक वर्षात अंजूरफाटा ते वंजारपट्टी नाका बागेफिरदोस हा 80 फूट रुंद व साडेचार किलोमीटर लांबीचा रस्ता आठ कोटी 91 लाख रुपये खर्चून तयार केला आहे. या रस्त्याचे बांधकाम उल्हासनगरमधील ईगल कन्स्ट्रक्‍शनला दिले गेले होते. या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने काही ठिकाणी रस्त्यातील डांबर एकाच ठिकाणी गोळा होऊन उंचवटे तयार झाले आहेत; तर काही ठिकाणी खड्डे पडले असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत नागरिकांनी ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे तत्कालीन आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून गोपनीय चौकशी करून ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्याच्या हेतूने मुंबईच्या आयआयटी या सरकारी संस्थेकडून रस्त्याचा अहवाल मागितला होता. दरम्यान, पालिकेच्या बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या खोट्या मोजमापाचा अहवाल सादर करीत शिफारस केली आणि पालिकेच्या लेखा विभागाकडून ठेकेदार ईगल कन्स्ट्रक्‍शन कंपनीला पाच कोटी 40 लाख रुपयांचे देयक अदा केले गेले. मात्र ठेकेदाराने आपल्या कामात निकृष्ट साहित्य वापरून रस्ता तयार केल्याचे आढळून आल्याने पालिकेने आयआयटीला तपासणीसाठी ठेकेदाराच्या अनामत रकमेतून 16 लाख 40 हजार रुपये भरले आहेत. मात्र या रस्त्यांची दोन महिन्यांपूर्वी तपासणी होऊनही अद्याप पालिकेला अहवाल उपलब्ध झाला नसल्यामुळे पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी खराब रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

आयआयटी संस्थेचे प्रमुख धरमवीर सिंग यांचाशी संपर्क केला असता काही कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आपण अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
- मनोहर हिरे, आयुक्त, भिवंडी पालिका 

मनोहर हिरे यांनी तक्रारीची दखल घेऊन आयआयटी संस्थेने पालिकेला अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश दिले आहेत. 
- धरमवीर सिंग, प्रमुख, आयआयटी 

Web Title: IIT avoiding the investigation report