एकाच वेळी 10 लाख विद्यार्थी बनवणार सौरदिवे!

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

गांधी जयंतीनिमित्त आयआयटी मुंबईचा अनोखा विक्रम, विविध देशांतील विद्यार्थ्यांचा सहभाग. 

मुंबई : गांधी जयंतीनिमित्त जगभरात एकाच वेळी १० लाख विद्यार्थ्यांना सौरदिवे बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचा अनोखा विक्रम आयआयटी मुंबईतील प्राध्यापक चेतन सिंग सोलंकी करणार आहेत. गांधी जयंतीदिनी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.

गतवर्षी आयआयटी- मुंबईने सौरदिवे तयार करून ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला होता. कार्बन उत्सर्जनाची समस्या दिंवसेदिवस गंभीर होत असून ते रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न होत आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून चेतन सिंग सोळंकी यांनी सौरऊर्जेचा वापर करून देशभरातील शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वीज उपलब्ध करून देण्याचा ध्यास घेतला आहे. सोलंकी यांनी केंद्र सरकारच्या मदतीने देशभरात १० लाख सौरदिवे वाटले आहेत. तीन हजार महिलांना रोजगारही मिळवून दिला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलंकी विविध देशांत सौरऊर्जेचे महत्त्व सांगत आहेत. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर विविध देशांनी यात सहभागी होण्याची तयारी दर्शवली. 

२ ऑक्टोबररोजी या उपक्रमात भारतासह विविध देशांतील १० लाख विद्यार्थी सहभागी होतील. विद्यार्थ्यांना एकाच वेळी त्यांच्या भागांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी www.ggsy.in वर नावनोंदणी करावी.

एक लाख घरे सौरउर्जेने जोडणार
नागरिकांना केवळ सौरदिवे देऊन उपयोग होणार नाही. जेव्हा घराघरात सौरऊर्जेचा वापर होईल तेव्हाच खरा उद्देश साध्य होईल, असे मत प्राध्यापक चेतन सिंग सोलंकी यांनी व्यक्त केले. त्यामुळे गांधी जयंतीनिमित्त वर्षभरात एक लाख घरांना सौरऊर्जेवर आणण्याचा आमचा मानस असल्याचेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IIT MUMBAI initiative of making 1 milion solar lamp in one day