दिव्यात फेरीवाल्यांचा बेकायदेशीर व्यवसाय 

दिव्यात फेरीवाल्यांचा बेकायदेशीर व्यवसाय 


दिवा : ठाणे महापालिकेच्या हद्दीतील दिव्यात फेरीवाल्यांनी बेकायदेशीररित्या अतिक्रमण केले आहे. रेल्वेस्थानकालगतच्या रस्त्यावर हे फेरीवाले खुलेआम धंदा करताना दिसत असून त्याचा सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर स्थानक परिसरात फेरीवाल्यांना बंदी घातली गेली. मात्र, दिव्यात या बंदीला हरताळ फासला जात आहे. प्रशासन कारवाईचे धाडस दाखवत नसल्यामुळे फेरीवाल्यांचे चांगलेच फावले आहे. 

स्टेशन परिसरासह शहरात कुठेही एकही पार्किंगची जागा नाही. दिव्यात वाढत्या नागरीकरणामुळे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या गाड्या रस्त्यावरच पार्क केलेल्या असतात. त्यात फेरीवाल्यांचे रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याने नागरिकांनी चालायचे तरी कोठून? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाने शहरात "ना फेरीवाला क्षेत्र'चे फलक लावले आहेत. मात्र, त्या ठिकाणी फेरीवाले बसत नाहीत ना, याची पाहणी करण्यासाठी पालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे वेळ नसल्याचेच दिसून येते.

निवडणुकीच्या कामात कर्मचारी गुंतले असताना बिनधास्त धंदा थाटणारे फेरीवाले कारवाईला घाबरत नसल्याचे चित्र आहे. या फेरीवाल्यांमुळेच अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. यातून होणाऱ्या जीवितहानीला जबाबदार कोण असणार असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. शहरात वाहतूक पोलिस नसल्यामुळे रस्त्यावर गाड्या पार्क करणारे तसेच गर्दीतही गाडी वेगाने चालवणाऱ्या वाहनधारकांना कारवाईची भीती उरलेली नाही, अशी तक्रार नागरिक करत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com