एसटीतील बदली प्रक्रियेत गैरव्यवहार?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

एसटीच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांची बदली प्रक्रियाच अनियोजित वेळी घेतली जात आहे. त्यातही पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांची गैरसोईच्या ठिकाणी बदली करून आता सोईच्या ठिकाणी बदली करण्यासाठी गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप एसटीच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

मुंबई: एसटीच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांची बदली प्रक्रियाच अनियोजित वेळी घेतली जात आहे. त्यातही पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांची गैरसोईच्या ठिकाणी बदली करून आता सोईच्या ठिकाणी बदली करण्यासाठी गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप एसटीच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. अंशतः बदल असल्याचे सांगून सुमारे ३० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेशात चक्क वेळोवेळी बदल केल्याचे दिसून येत आहे.

एसटी महामंडळातील प्रशासकीय किंवा विनंती बदली प्रक्रिया एसटीच्या आदेशानुसार मे, जून किंवा डिसेंबर या महिन्यात राबवली जाते; मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेतच एसटीत बदली प्रक्रिया सुरू आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांची आंतरजिल्हा बदली केली जात आहे. सुरुवातीला एसटीचे कर्मचारी व औद्योगिक खाते विभागाने अधिकारी आणि पर्यवेक्षकांना गैरसोईच्या ठरतील अशा बदल्या केल्या. त्यानंतर आता सोईच्या बदल्या करण्यासाठी गैरव्यवहार केला जात असल्याचे एसटीच्या एका अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर ‘सकाळ’शी बोलतांना सांगितले.

कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकारी मिळून सुमारे ५०० बदल्या करण्यात आल्या आहेत. यापैकी अधिकारी आणि पर्यवेक्षक पदावरील अधिकाऱ्यांना आता सोईचे ठिकाण देण्यासाठी धावपळ सुरू आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असतानाही एसटीमध्ये सोईच्या बदलीसाठी अधिकाऱ्यांची धावपळ दिसून येत आहे.

एसटीकडे यासंदर्भातील नेमकी तक्रार नाही, आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव कळल्यास या प्रकरणाची चौकशी करता येणार, त्यामुळे अशा प्रकरणावर प्रतिक्रिया देता येणार नाही.
- माधव काळे, एसटी महाव्यवस्थापक, कर्मचारी व औद्योगिक खाते

अंशतः बदल करण्यात गैरव्यवहार?
अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची बदली आधीच गैरसोईची केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या. त्यानंतर त्या अडचणी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या सोईप्रमाणे सुमारे ३० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचे अंशतः बदल करण्यात आल्याचे आदेश पुन्हा काढण्यात आले आहेत. त्यामुळे यामध्ये गैरप्रकार असल्याची चर्चा एसटीच्या मुख्यालयात सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal cases in the ST transfer process?