बेकायदा चाळींची यूट्युबवर विक्री! 

बेकायदा चाळींची यूट्युबवर विक्री! 

नालासोपारा  - वसई-विरार परिसरात चाळमाफियांनी थैमान घातले आहे. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी या माफियांनी आता सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. एका दलालाने चक्क बेकायदा चाळीच्या विक्रीची यूट्यूबवर जाहिरातबाजी सुरू केली आहे. या चाळीला पालिकेतर्फे पाणीपुरवठा असल्याचा दावाही त्याने या जाहिरातीत केला आहे. 

विरारमधील कोपरी परिसरात उभ्या राहिलेल्या बेकायदा चाळींच्या विक्रीचा एक व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल झाला आहे. त्यात एकाने चाळीचे चित्रीकरण करून ही चाळ चार लाखांत विकणार असल्याची जाहिरात केली आहे. या चाळीला पालिकेकडून पाणीपुरवठा होणार असून घरपट्टी, मीटर आदी सुविधाही असल्याचा दावा या दलालाने केला आहे. http://shreeestateagency.in/ या लिंकवर असलेला हा व्हिडीओ हजारांहून अधिक जणांनी पहिला असून पालिकेला मात्र याचा कोणताच थांग नाही. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

चाळमाफियांनी बेकायदा चाळी विकण्यासाठी लढवलेली ही शक्कल पालिकेसमोर नवे आव्हान ठरणार आहे. वसई, नालासोपारा, विरार परिसरातील खासगी, वन विभागाच्या जमिनीवर भूमाफियांनी बेकायदा चाळी विकसित केल्या आहेत; मात्र त्याला वीज, पाणी, रस्ते अशा आवश्‍यक सुविधा न देता अनेक ग्राहकांची फसवणूक करून त्यांना घरे विकल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आलेली असताना आता दलालांमार्फत चाळींच्या विक्रीसाठी यूट्यूबद्वारे भुरळ घातली जात असल्याने पालिकेने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

या चाळी बेकायदा आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. बेकायदा बांधकामांवर महापालिका कारवाई करत आहे. यूट्यूबवरील जाहिरातीनुसार आम्ही संबंधित ठिकाणी पाहणी करून लवकरच कारवाई करू. 
- सतीश लोखंडे,  आयुक्त, वसई विरार महापालिका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com