शहरभर बेकायदा विद्युत रोषणाई 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

तुर्भे - ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल, बार, मॉल व दुकानमालक बाहेर लावलेल्या झाडांवर सर्रासपणे रोषणाई करून नियमांचे उल्लंघन करीत आहेत. याबाबत नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून संबंधित विभाग अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिलेले असताना या अधिकाऱ्यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. आठही विभागातील अधिकाऱ्यांनी उद्यान विभागाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याने हॉटेल, मॉल व बारच्या बाहेर संपूर्ण झाडेच या रोषणाई वेढलेली पाहायला मिळत आहेत. 

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोणत्याही जाहिराती पालिकेच्या परवानगीशिवाय लावणे हा महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंधक कायदा 1995 नुसार दखलपात्र गुन्हा आहे. तरीही तो सर्रास मोडीत काढला जातो. नाताळ व नवी वर्षाच्या स्वागतासाठी शहरभर जाहिरातींचा भडिमार केला जातो. यासाठी व्यापारीवर्गाकडून मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन केले जात आहे. मात्र यावर पालिका अधिकाऱ्यांकडून कारवाई तर सोडाच; या व्यापाऱ्यांना समजही देण्याची तसदी घेत नसल्याने शहरातील झाडांवर या वर्षीही अत्याचार सुरू आहेत. 

कोपरखैरणे विभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाडांवर विद्युतरोषणाई करण्यात आलेली आहे. मात्र कारवाई होत नसल्याने ठिकठिकाणी असे प्रकार सुरू आहेत. 

याविरोधात पर्यावरण सेवाभावी संघटनेने महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र पालिकेकडून फक्त आदेश दिला जातोय. कारवाई होत नसल्याचा आरोप या संस्थेचे बाळासाहेब शिंदे यांनी केला आहे. 

याबाबत संबंधित विभाग अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, की कोणालाही विद्युत रोषणाईसाठी परवानगी देऊ नये. जर कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल. तसेच त्यांना कारवाई करण्याबाबत पुन्हा आदेश दिले जातील. 
- नितीन काळे, उपायुक्त, विद्यान विभाग, पालिका 

Web Title: Illegal electric lighting around the city