फेरीवाल्यांचे कंबरडे मोडणार 

फेरीवाल्यांचे कंबरडे मोडणार 

नवी मुंबई - शहरातील बेकायदा फेरीवाल्यांचा उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेने मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार सध्याच्या अतिक्रमणविरोधी पथकाव्यतिरिक्त आणखी ७० पोलिस कर्मचाऱ्यांच्या एका तुकडीचे सहकार्य घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही समस्या कायमचीच संपवण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळी फिरते पथक तैनात करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण संपल्यानंतरही ही मोहीम सुरू राहणार आहे. 

ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ या उपनगरांत बेकायदा फेरीवाल्यांचे प्रमाण वाढत आहे. पदपथ त्यांनी काबीज केले असतानाच आता रस्त्यांवरही बिनधोक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ऐरोली सेक्‍टर ८ मध्ये तर संध्याकाळी फेरीवाले दादागिरी करून रस्ते अडवतात. वाहनचालक व प्रवाशांना हाणामारी, शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. 

वाशी सेक्‍टर ९ येथील मिनी मार्केट त्याला अपवाद नाही. नेरूळ येथील रेल्वेस्थानकाच्या परिसरात दोन्ही बाजूला असलेल्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य पोहोचवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे यासंदर्भात पालिका आयुक्त एन. रामास्वामी यांनी गांभीर्याने विचार केला आहे. 

संध्याकाळी पथकाची कारवाई थंडावल्यानंतर फेरीवाले पुन्हा ठाण मांडतात, असा अनुभव असल्याने या त्याला आळा घालण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा अधिकारी आणि ७० पोलिस कर्मचाऱ्यांची वाढ केली आहे. हे पथक संध्याकाळी ७ नंतर कारवाई करणार आहे. या वेळी फेरीवाल्यांना अटकही करण्यात येणार आहे. नवी मुंबईबाहेरील फेरीवाल्यांचे प्रमाण अधिक आहे. चेंबूर, मानखुर्द, ठाणे, भिवंडी येथून येणारे बहुसंख्य फेरीवाले हे त्यांच्या व्यवसायाचे साहित्य परिसरात लपवून ठेवतात. त्यांचे कंबरडे मोडण्यासाठी हे साहित्य शोधून काढण्याची जबाबदारी काही अधिकाऱ्यांवर दिली आहे. 

सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेणार
शहरात एक हजार १०० पेक्षा अधिक सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्याद्वारे रस्ते, पदपथ, चौक, बाजारपेठा, उद्याने व शाळांवर नजर ठेवली जाणार आहे. ना फेरीवाला क्षेत्रात बसलेल्या बेकायदा फेरीवाल्यांवर त्याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. 

नेरूळ, वाशी व कोपरखैरणे या भागांत सर्वाधिक बेकायदा फेरीवाल्यांची समस्या आहे. ती सोडवण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाचे सर्वेक्षण संपल्यानंतर कारवाईला सुरुवात होणार आहे. त्याकरिता अतिरिक्त पोलिस कर्मचारी मंजूर करण्यात आले आहे. 
- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त, पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com