ठाणे-बेलापूर मार्गावर अवैध पार्किंग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे ते ठाणेदरम्यान खासगी कंपन्यांची वाहने बेकायदा रस्त्यांच्या दुतर्फा उभी करण्यात येतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. याखेरीज पार्किंगमुळे अपघांताचीही शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याकडे वाहतूक पोलिस कानाडोळा करत असल्याचे दिसून येते.

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे ते ठाणेदरम्यान खासगी कंपन्यांची वाहने बेकायदा रस्त्यांच्या दुतर्फा उभी करण्यात येतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. याखेरीज पार्किंगमुळे अपघांताचीही शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याकडे वाहतूक पोलिस कानाडोळा करत असल्याचे दिसून येते.

ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली येथील उड्डाडणपुलाचे काम झाल्यानंतर रबाळे येथे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्याचप्रमाणे भारत-बिजली, ऐरोली रेल्वेस्थानक, चिंचपाडा, दिघा, गणेशनगर, मुकंद कंपनी, तुर्भे नाका या ठिकाणी रस्त्यांच्या कडेला बेकायदा पार्किंगमुळे वाहतुक कोंडी होत आहे. त्यातच रबाळे टी-जंक्‍शनजवळील कल्वर्टचे काम सुरू असल्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक ठाणे-बेलापूर मार्गे वळवण्यात येत असल्यामुळे वाहतुक कोंडीत भर पडत आहे. ठाणे-बेलापूर मार्ग आठ पदरी करण्यात आला आहे. मात्र या आठ पदरी रस्त्यांच्या कडेला खासगी कंपनीतील वाहनचालक, स्कूल बसचालक रस्त्याच्या कडेला दिवसभर वाहने उभी करतात. रस्त्याच्या कडेला वाहने उभी केल्यानंतर एमआयडीसीच्या किंवा पालिकेच्या असणाऱ्या जलवाहिनीतील व्हॉल्वमधून झालेल्या पाणीगळतीमधून पाणी घेऊन वाहने धुण्याचे प्रकार करत असतात. ऐरोली येथील माईंड स्पेस कंपनीच्या जवळील रस्त्याच्या बाजूला वाहने उभी करणारे वाहनचालक पत्त्यांचा अड्डाच पदपथावर मांडत असल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथावरून चालणे जिकिरीचे होत आहे. रस्त्याच्या कडेला कंपन्यांच्या बसेसबरोबरच प्रवासी वाहनेदेखील दिवसभर उभी केली जातात. 

रस्त्याच्या कडेला वाहने उभी केल्यामुळे सकाळच्या वेळी सफाई कामगारांनाही रस्तेसफाई करताना अडचणी येतात. त्यामुळे रस्त्यांच्या बाजूला घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे सफाई कामगारांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ऐरोली येथील पटनी कंपनीसमोरील एमआयडीसीच्या भूखंडावर पावसामुळे गवत वाढल्यामुळे या भूखंडावर उभी करण्यात येणारी वाहने ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा ते तुर्भेदरम्यान रस्त्याच्या कडेला उभी करण्यात येतात. या बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

रस्त्यांच्या कडेला उभ्या असणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येते. नव्याने वाहने उभी करण्यात येत असतील, तर त्यावर कारवाई करण्यात येईल.
- बी. एम.औटी, वाहतूक पोलिस निरीक्षक, रबाळे.

रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या वाहनांच्या पाठीमागे गर्दुल्ले गांजा ओढतात. या वाहनचालकांकडून त्या ठिकाणाच गुंड प्रवृत्तीची मुले पार्किंगच्या नावाखाली पैसेही उकळतात. या बेकायदा बाबींकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
- उमेश गायकवाड, स्थानिक नागरिक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal parking on Thane-Belapur road