ठाणे-बेलापूर मार्गावर बेकायदा पार्किंग

ठाणे-बेलापूर मार्गावर बेकायदा पार्किंग

वाशी - ठाणे-बेलापूर मार्गावरील तुर्भे ते ठाणेदरम्यान खासगी कंपन्यांची वाहने बेकायदा पार्क करण्यात येतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. याखेरीज पार्किंगमुळे अपघातांचीही शक्‍यता वर्तवण्यात येत आहे; मात्र याकडे वाहतूक पोलिस कानाडोळा करत असल्याचे दिसून येते.

ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली येथील उड्डाणपुलावरचे काम झाल्यानंतर रबाळे येथे वाहतूक कोंडीत भर पडते. त्याचप्रमाणे भारत बिजली, ऐरोली रेल्वेस्थानक, चिंचपाडा, दिघा, गणेशनगर, मुकंद कंपनी, तुर्भे नाका या ठिकाणी बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामानंतरही अवजड वाहनांची वाहतूक ठाणे-बेलापूर मार्गे वळवण्यात येत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

ठाणे-बेलापूर मार्ग आठ पदरी करण्यात आला आहे; मात्र या आठ पदरी रस्त्याच्या कडेला खासगी कंपनीतील वाहनचालक, स्कूल बसचालक रस्त्याच्या कडेला दिवसभर पार्किंग करतात. त्याचप्रमाणे परिसरातील नगारिकही रात्रीच्या वेळेस वाहने पार्क करतात.

ऐरोली येथील पटनी कंपनीसमोरील एमआयडीसीच्या भूखंडावर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कंपनीचे कार्यक्रम होत असल्यामुळे या भूखंडावर पार्क करण्यात येणारी वाहने ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा ते तुर्भेदरम्यान रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात येतात. या बेकायदा पार्क करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

यासंदर्भात वाहूतक पोलिस उपायुक्त सुनील लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कामानिमित्त बाहेर असल्याचे सांगत दुसऱ्या अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. रबाळे वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक योगेश माने यांच्याशी संपर्क साधला असता, रस्त्याच्या बाजूला पार्क करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत असते, असे स्पष्ट केले.

रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या वाहनांच्या पाठीमागे गर्दुल्ले गांजा ओढतात. तसेच घाण करतात. या वाहनचालकांकडून त्या ठिकाणचे गुंड प्रवृत्तीची मुले पार्किंगच्या नावाखाली पैसेही उकळतात. या बेकायदा बाबींकडे पोलिसांनी लक्ष देणे आवश्‍यक आहे. 
- उमेश गायकवाड, नागरिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com