उल्हासनगरातील मोठ्या मूर्त्यांच्या विसर्जनासाठी दुर्गाडी खाडीचा मार्ग सुकर करा

उल्हासनगरातील मोठ्या मूर्त्यांच्या विसर्जनासाठी दुर्गाडी खाडीचा मार्ग सुकर करा

उल्हासनगर : गेल्या काही महिन्यांपूर्वी गणपतीच्या मोठ्या मुर्त्या गणेशोत्सव मंडळांनी बुक केलेल्या आहेत. मात्र उल्हासनगर पालिकेने 10 फुटांवरील गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे मंडळे अडचणीत आहेत. मोठ्या मूर्त्यांच्या विसर्जनासाठी 20 फुटाचा कृत्रिम तलाव तयार करावा किंवा कल्याणच्या दुर्गाडी खाडीचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी शिवसेनेने पालिका आयुक्त गणेश पाटील,पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांना निवेदनाद्वारे केली.

शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,आमदार डॉ.बालाजी किणीकर,विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे,गटनेते रमेश चव्हाण यांनी हे निवेदन दिले आहे.उपशहरप्रमुख राजेंद्र साहू,दिलीप गायकवाड,महिला आघाडी संघटक मनीषा भानुशाली,उत्तरभारतीय शहर संघटक के.डी.तिवारी,विभागप्रमुख सुरेश सोनवणे,माजी नगरसेविका समिधा कोरडे आदी यावेळी उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगरातील मोठया मूर्त्यांचे कल्याणमधील दुर्गाडी खाडीत विसर्जन करण्यात येत होते. मात्र तीन वर्षांपूर्वी कल्याणच्या पालिका-पोलीस प्रशासनाने विसर्जनास मज्जाव केलेला आहे.त्याअनुषंगाने शिवसेनेच्या अपेक्षा पाटील ह्या महापौर व मनोहर हिरे आयुक्त असताना आयडीआय कंपनी जवळ नैसर्गिकरित्या वाहत असलेल्या उल्हासनदीवर गणेश घाट बांधण्यात आला.तिथे मोठ्या मूर्त्यांचे विसर्जन करण्यात येत होते. मात्र, विसर्जनामुळे नदी प्रदूषित होत असल्याची जनहित याचिका एका सामाजिक संस्थेने न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे उल्हास व वालधुनी नदीवर 10 फुटाच्या वरील मूर्त्यांचे विसर्जन करता येणार नाही.

पालिकेने शहरात चार कृत्रिम तलाव विसर्जनासाठी तयार करण्याचे काम सुरू केले आहे.त्यात मोठ्या मूर्त्यांचे विसर्जन अशक्य असल्याने हे तलाव 20 फुटापर्यंत खोल करावे.किंवा कल्याणच्या पालिका पोलीस प्रशासनाशी बोलणी करून दुर्गाडी खाडीचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी शिवसेनेने केली.त्यावर कल्याणचे पालिका आयुक्त व पोलीस उपायुक्त यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार असे आश्वासन गणेश पाटील,प्रमोद शेवाळे यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com