बाप्पा लालबागच्या राजासारखाच पाहीजे

अरविंद पाटील : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

रोहा : कधी बाहुबली; तर कधी खंडोबा अशा प्रभावाखाली गणेशमूर्ती तयार होतात. यंदा मात्र, गाजलेली एखादी मालिका किंवा चित्रपटाऐवजी लालबागच्या राजानेच पेणसह रायगड जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांत राज्य गाजवले आहे. तब्बल ४० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गणेशमूर्ती या ‘लालबागचा राजा’ पद्धतीच्या आहेत.

रोहा : कधी बाहुबली; तर कधी खंडोबा अशा प्रभावाखाली गणेशमूर्ती तयार होतात. यंदा मात्र, गाजलेली एखादी मालिका किंवा चित्रपटाऐवजी लालबागच्या राजानेच पेणसह रायगड जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांत राज्य गाजवले आहे. तब्बल ४० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गणेशमूर्ती या ‘लालबागचा राजा’ पद्धतीच्या आहेत.

गणेशोत्सव दीड महिन्यावर आला असल्याने गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेणमधील मूर्तिकारांची लगबग वाढली आहे. दरवर्षी या मूर्तींवर दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका अथवा चित्रपटांचा प्रभाव दिसून येतो. दोन वर्षांपूर्वी ‘जय मल्हार’ मालिका सुरू असताना खंडोबाच्या रूपातील गणेशमूर्तीना अधिक पसंती होती. ‘बाहुबली’लाही चांगली पसंती मिळाली होती. 

या वर्षी मात्र ‘लालबागचा राजा’ पद्धतीच्या सिंहासनावर बसलेल्या गणेशमूर्तींना अधिक मागणी असल्याचे मूर्तिकार ओंकार साळवी यांनी सांगितले. पेणमधील कारखान्यात तयार होत असलेल्या मूर्तींमध्ये सुमारे ४० ते ५० टक्के मूर्ती या पद्धतीच्या आहेत. 

शहरात जिप्समला  अधिक पसंती
शाडू मातीच्या गणेशमूर्ती पर्यावरणस्नेही असल्या, तरी त्या किमतीला पीओपी (जिप्सम) मूर्तींपेक्षा सुमारे ३० ते ४० टक्के अधिक महाग असतात . शाडू मातीच्या मूर्ती वजनाला जड असतात. या मातीपासून  बनवलेल्या मूर्ती अधिक नाजूक असतात. त्यामुळे ३ फुटांपेक्षा जास्त मोठ्या मूर्ती बनवू शकत नाहीत. पीओपीपासून बनवलेल्या मूर्ती किमतीला कमी, वजनाला हलक्‍या, अधिक मजबूत व मोठ्या मूर्ती सहज बनवता येतात. मात्र या मूर्ती पर्यावरणस्नेही नसतात. 
शहरी भागात पीओपी; तर ग्रामीण भागात शाडू मातीच्या मूर्तींना अधिक पसंती असते, असे रोह्यातील सिद्धिविनायक कला केंद्राचे मालक किशोर वारगे यांनी सांगितले. 

किमतीत ४० टक्के वाढ
महागाई, मजुरीचे वाढलेले दर, इंधनवाढीमुळे वाहतुकीचा वाढता खर्च आणि विविध करात वाढ झाल्याने गणेशमूर्तीच्या किमती वाढल्या आहेत. या वर्षी त्यात जीएसटीची भर पडली आहे. जीएसटीमुळे जिप्सम, रंग आणि इतर कच्या मालाच्या किमती सुमारे १८ ते २० टक्के वाढल्या असल्याचे कारखानदार सांगतात. त्यामुळे मूर्तींच्या किमती सुमारे ४० टक्के वाढल्या आहेत. 

या वर्षी ‘लालबागचा राजा’ पद्धतीच्या मूर्तींना अधिक मागणी आहे. कारखान्यात तयार होणाऱ्या सुमारे ५ हजार मूर्तींमध्ये सुमारे निम्मी संख्या या पद्धतीच्या मूर्तींची आहे.
- दीपक पाटील, मालक राजराजेश्वरी कला केंद्र, हमरापूर- पेण.

महागाई, मजुरी, वाहतूकखर्च यामुळे मूर्तींच्या किमती वाढतात. यंदा जीएसटीसुद्धा लागू झाली असल्याने किमतीत ४० टक्के वाढ आहे.
- किशोर वारळे, मालक, सिद्धिविनायक कला केंद्र, रोहा

दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्तीची मागणी असते. मात्र या वेळी घरच्या मंडळींनी ‘लालबागचा राजा’ पद्धतीच्या मूर्तीचा आग्रह धरल्याने त्या पद्धतीच्या मूर्तीची मागणी नोंदवली आहे.
- अभिषेक चिपळूणकर, ग्राहक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: impact of lalbaugcha raja