अभय योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात

अभय योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात
अभय योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात

नवी मुंबई : महापालिकेच्या थकीत मालमत्ता करधारकांना दिलासा देणारी अभय योजना १ डिसेंबरपासून लागू करण्यात आली आहे. या अभय योजनेमुळे शहरातील एक लाख ४५ हजारपेक्षा जास्त थकबाकीदारांना मालमत्ता करावरील दंडाची रक्कम भरण्यावर ७५ टक्केपर्यंत मुभा मिळणार आहे. ही अभय योजना १ डिसेंबर २०१९ पासून पुढील ४ महिने सुरू राहणार आहे. 

सद्यस्थितीत नवी मुंबई महापालिकेची मालमत्ता कराची थकबाकी २१०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ता करधारकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने २७ फेब्रुवारी २०१९ च्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरावानुसार मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीकरिता अभय योजना लागू करण्यास मंजुरी दिली होती. महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम १५२ (१) (अ) अन्वये या ठरावास सरकार मान्यता मिळणे आवश्‍यक असल्याने १४ मे २०१९ च्या पत्रान्वये महापालिका आयुक्त यांच्यामार्फत हा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाबाबत सरकारस्तरावर महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्यानुसार सरकारने १३ सप्टेंबर २०१९ ला अभय योजना लागू करण्यास मंजुरी दिली. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये एक लाख ४५ हजार ८८७ थकीत मालमत्ता करधारक आहेत. त्यामध्ये ६८ हजार ६३३ गावठाण, १५ हजार ८०१ विस्तारित गावठाण आणि ५८ हजार ९९१ सिडको विकसित नोडमधील मालमत्ता/सोसायटी भूखंड यांचा समावेश होतो. अनेक ठिकाणी सीआरझेड नियमावलीसारखे नियमात बदल झाल्यामुळे अनेक नागरिकांच्या मालमत्ता करावर दंडनीय कर आकारणी होत आहे. या मालमत्ता तसेच शासकीय-निमशासकीय मालमत्ता, सरकार अंगिकृत उपक्रम व महापालिका क्षेत्रातील इतर मालमत्ता यांना अभय योजना लागू केल्याने थकीत मालमत्ता कराची प्रभावीपणे वसुली होण्यास मदत होणार आहे.

अशी मिळणार सूट!
- पुढील ४ महिने दोन टप्प्यांत ही मालमत्ता कर अभय योजना लागू असणार.
- १ डिसेंबर २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीत थकीत मालमत्ताकराची रक्कम अधिक २५ टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास दंडात्मक रकमेतून ७५ टक्के माफी मिळणार.
- १ फेब्रुवारी २०२० ते ३१ मार्च २०२० या पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत थकीत मालमत्ताकराची रक्कम अधिक ३७.५० टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास दंडात्मक रक्कमेतून ६२.५० टक्के माफी मिळणार.
- १ डिसेंबर रोजी सदर अर्ज ऑनलाईन उपलब्ध असणार असून, रक्कमही ऑनलाईन भरणा करता येणार आहे. तसेच २ डिसेंबरपासून सर्व भरणा केंद्रांवर रक्कम भरणा करता येईल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com