
सणासुदीत कर्जमागणीत वाढ!
मुंबई : सणासुदीत बँका आणि वित्तसंस्थांकडील कर्जांच्या मागणीत वाढ झाल्याने अर्थजगतात उत्साह आहे. दीड वर्षापूर्वी कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर प्रथमच कर्जाची मागणी वाढल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.
सध्या कर्जांचे कमी झालेले व्याजदर, सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांनी केलेली खरेदी व लॉकडाऊनचे निर्बंध उठवल्याने वाढलेला उत्साह, यामुळे सामान्यांकडून कर्जाची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षभरात देशात ७ लाख कोटी रुपयांची कर्जे घेण्यात आली. या वर्षीच्या ४ जूनपर्यंतच्या पंधरवड्यात कर्जमागणीत ५.७ टक्के वाढ झाली; तर २२ ऑक्टोबरपर्यंतच्या पंधरवड्यातील कर्जमागणी ६.८ टक्के वाढली, असे केअर रेटिंग मानांकन संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
कोरोनापूर्व काळात म्हणजे एप्रिल २०२० पर्यंत कर्जाच्या मागणीत सात टक्क्यांपर्यंत वाढ होत होती. त्यानंतर कोरोनामुळे उद्योग-धंदे ठप्प झाल्याने दीड वर्ष ती वाढ ५.१ ते ६.९ टक्क्यांच्या टप्प्यातच फिरत होती. कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यानही कर्जांना मागणी कमी होती; मात्र आता अर्थचक्र वेगाने पूर्वपदावर येत असून कर्जांचे व्याजदर अजूनही कमीच आहेत.