लोकलवर दगड फेकीची मालिका सुरूच; सुरक्षा रक्षक जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

लोकल वेगात असल्याने लोकलवर फेकलेले दगड शेवटच्या डब्यावर धडकले. यातील काही दगड मोटरमॅनच्या केबिनमध्येही गेले. त्यामुळे केबिनमध्ये असलेले लोकलगार्ड आर. के. यादव दगडफेकीत जखमी झाले.

मुंबई : हार्बर मार्गावर आज (शुक्रवारी) सकाळी सीएसएमटी-बेलापूर मार्गावर वाशीदरम्यान लोकलवर दगडफेकीची घटना घडली. या घटनेत लोकलचे गार्ड आर. के. यादव जखमी झाले असून त्यांना मानखुर्द स्थानकातील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकरणी वाशी पोलिसांनी अज्ञान व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

लोकलवर दगडफेकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कुर्ला आणि विद्याविहारच्या दगडफेकीच्या घटनानंतर पुन्हा एकदा आज सकाळी 11. 30 वाजता बेलापूरहून सीएसएमटीकडे निघालेलेली हार्बर मार्गावरील लोकल वाशीहून निघाल्यानंतर मानखुर्द स्थानकाजवळ येताच एका अज्ञात व्यक्तीकडून लोकलवर दगडफेक करण्यात आली. लोकल वेगात असल्याने लोकलवर फेकलेले दगड शेवटच्या डब्यावर धडकले. यातील काही दगड मोटरमॅनच्या केबिनमध्येही गेले. त्यामुळे केबिनमध्ये असलेले लोकलगार्ड आर. के. यादव दगडफेकीत जखमी झाले.

दगडफेकीची मालिका सुरूच
नुकतेच कुर्ला ते विद्याविहार आणि कुर्ला ते टिळक नगर स्थानकादरम्यान दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. ज्यामध्ये 4 प्रवासी जखमी झाले होते. या घटनेनंतर
पोलिसांनी दगड फेकणार्‍या आरोपीला अटक केली होती. तरी सुध्दा दगडफेकीच्या घटना कमी झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे अशा समाज कंटकांविरूध्द रेल्वे पोलिस आणि रेल्वे अधिकारी यांनी विशेष मोहीम देखील राबविली होती. तरी सुध्दा काही दगडफेकीच्या घटना कमी होत नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी रेल्वेच्या कारभार विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Incident of stones thrown on the local railway The guard was injured