दरात वाढ न करता उत्पन्नवाढीसाठी नवे तंत्र

संतोष मोरे
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई - मध्य रेल्वेने तिकीट दरात वाढ न करता जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन पावतीवर; तसेच वातानुकूलित एक्‍स्प्रेसमधील बेडशीटच्या लिफाफ्यावर व नॅपकिन्सवर कंपनीच्या जाहिराती छापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर जाहिरातींच्या माध्यमातून उत्पन्न वाढवणारा मध्य रेल्वेचा मुंबई विभाग देशात पहिला ठरला आहे.

माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 2017 मध्ये ही संकल्पना मांडली होती. मध्य रेल्वे प्रशासन कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या पे स्लिपसाठी वर्षाला 2.5 लाख रुपये खर्च करते. मुंबई विभागात 36 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या संकल्पनेमुळे कर्मचाऱ्यांच्या स्टेशनरीवर होणाऱ्या खर्चात बचत होईल; तसेच जाहिरातदार वर्षाला जाहिरात छापण्यामागे पाच ते सहा लाख रुपये खर्च करणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील वातानुकूलित कोचमध्ये पुरवण्यात येणाऱ्या बेडशीट व नॅपकिन्ससाठी 96 लाख लिफाफे वापरण्यात येतात. बेडशीट व नॅपकिन्सवरील लिफाफे उघडताना प्रवाशांचे त्या लिफाफ्यावरील जाहिरातीकडे लक्ष जाईल, हीच बाब आम्ही हेरून त्यावर जाहिराती देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रेल्वेत देण्यात येणारे लिफाफे रेल्वे छपाई करते. या जाहिरातीचे कंत्राट एका कंपनीला देण्यात येईल. त्यांनी ते स्वत: छापून रेल्वेला लिफाफे मोफत देण्याचे ठरले आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

एक कोटीचे उत्पन्न अपेक्षित
गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या वेतन पावतीवर जाहिराती छापण्यास इच्छुक आहेत. अशाप्रकारच्या जाहिरातीच्या माध्यमातून रेल्वेला एक कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. रेल्वेची आर्थिक व्यवस्था सुधारणे हा या मागचा उद्देश आहे, असे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Web Title: income expance new technology railway ticket rate advertise