'द इनकम्प्लिट मॅन'चे प्रकाशन लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

मुंबई - रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांच्या "द इनकम्प्लिट मॅन' या आत्मकथनात्मक पुस्तकाच्या प्रकाशनाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी 13 मार्चला होणार असून, तोपर्यंत या पुस्तकाच्या प्रकाशनावर स्थगिती राहील, असे न्या. संदीप शिंदे यांनी बुधवारी (ता. 20) दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

उद्योगपती डॉ. विजयपत सिंघानिया यांच्या आत्मकथनपर पुस्तकाच्या प्रकाशनाला मनाई आदेश मिळावा, यासाठी त्यांचे पुत्र व रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी 25 सप्टेंबरला केलेला अर्ज दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. या संदर्भात ठाणे न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणीही उच्च न्यायालयात घेण्याची मागणी विजयपत सिंघानिया यांनी केली आहे. या दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी उच्च न्यायालयात न्या. शिंदे यांच्यासमोर सुरू होती.

गौतम सिंघानिया यांनी आपणास घरातून हाकलून दिल्याचा आरोप विजयपत सिंघानिया यांनी केला आहे. त्यांच्या 80 व्या वाढदिवशी पेंग्विन रॅण्डम हाउस इंडिया या संस्थेमार्फत या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते. या पुस्तकामुळे रेमंड समूह आणि आपली व कुटुंबाची प्रतिमा मलिन होण्याची शक्‍यता असल्याने प्रकाशनाला मनाई करावी, असे गौतम सिंघानिया यांचे म्हणणे होते. याचिकादाराने नेमके मुद्दे नमूद केलेले नाहीत, त्यामुळे या पुस्तकामुळे काय बदनामी होईल हे आताच सांगणे अवघड आहे, असे नमूद करत सत्र न्यायालयाने गौतम सिंघानिया यांचा अर्ज फेटाळला होता.

Web Title: The Incomplete Man Book Publication Stop High Court