लोकलमध्ये दिव्यांगांच्या डब्यामधे घुसखोरांची वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकल अर्थात उपनगरी गाड्यांमधील दिव्यांग आणि महिलांच्या डब्यात घुसखोरांची संख्या वाढली आहे.

ठाणे : मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकल अर्थात उपनगरी गाड्यांमधील दिव्यांग आणि महिलांच्या डब्यात घुसखोरांची संख्या वाढली आहे. लोकलमधील वाढती गर्दी टाळण्यासाठी अनेक धडधाकट प्रवासी लोकलमधील दिव्यांग डब्यात घुसखोरी करतात.

हेही वाचा - कर्णकर्कश हाॅर्न वाजवू नका!

अशा प्रकारे घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी ठाणे रेल्वे सुरक्षा बलाकडून (आरपीएफ) नेहमीच कारवाई केली जाते. त्यानुसार, २०१९ या वर्षी केलेल्या कारवाईत पाच हजार ३०० प्रवासांना दंड ठोठावला आहे. दरम्यान, २०१७ आणि २०१८ च्या तुलनेत २०१९ या वर्षांत तब्बल दीड हजार घुसखोर वाढले आहेत.

हेही वाचा - ते आधी निर्जनस्थळी न्यायचे, आणि मग...

मुंबई महानगरीत कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे लोकलमध्ये नेहमीच गर्दी पाहण्यास मिळते. रेल्वे प्रशासनाने लोकलमध्ये महिला, पुरुष प्रवाशांसह दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष डब्यांची रचना केलेली असते. या दिव्यांगांच्या डब्यात तुलनेने कमी गर्दी असते. त्यामुळे अनेक जण या दिव्यांग डब्यात बेकायदा शिरकाव करून प्रवास करतात. याचा फटका दिव्यांग प्रवाशांना बसत असल्याने याबाबतच्या तक्रारी आरपीएफ पोलिसांकडे वाढू लागल्या आहेत.

अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आरपीएफने प्रत्येक घुसखोरावर पाचशे रुपये दंड आकारणे सुरू केले. मागील तीन वर्षांत दिव्यांग डब्यात घुसखोरी करणाऱ्या तब्बल १३ हजार ३२८ प्रवाशांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. यासोबतच महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली आहे. ही संख्या २०१७ मध्ये ७१, २०१८ मध्ये १६९ होती, ही संख्या २०१९ या वर्षभरात ६० वर आली असून या सर्वांवर आरपीएफने रितसर कारवाई केली आहे.  

web title : Increase in normal people in Handicapes compartment 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in normal people in Handicapes compartment