बटाट्याच्या दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

यावर्षीच्या हंगामात पावसामुळे लागवड होण्यास उशीर झाल्याने बाजारात बटाट्याचा तुटवडा निर्माण झाला. परिणामस्वरुप या आठवड्यात किलोमागे दोन ते तीन रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महिनाभरापूर्वी घाऊक बाजारात १३ ते १४ रुपये प्रतिकिलो असलेले बटाट्याचे दर सध्या १७ ते १८ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत.

नवी मुंबई : बाजारात कांदा आणि लसणाचे दर भडकले असतानाच, बटाट्याच्या दरातदेखील किरकोळ वाढ पाहायला मिळत आहे. वर्षभरापासून बटाट्याचे दर कमी होते. मात्र, यावर्षीच्या हंगामात पावसामुळे लागवड होण्यास उशीर झाल्याने बाजारात बटाट्याचा तुटवडा निर्माण झाला. परिणामस्वरुप या आठवड्यात किलोमागे दोन ते तीन रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महिनाभरापूर्वी घाऊक बाजारात १३ ते १४ रुपये प्रतिकिलो असलेले बटाट्याचे दर सध्या १७ ते १८ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत.

उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये बटाट्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सर्वाधिक बटाट्याचे शीतगृह हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. बाजारात दररोज बटाट्याच्या ६० ते ७० गाड्यांची आवक होण्याची आवश्‍यकता असते. मात्र, सध्या बाजारात केवळ ५० ते ६० गाड्या बाजारात दाखल होत आहेत. मागील पाच वर्षांत बटाट्याचा मागणी इतका पुरवठा होत असल्याने दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र, बाजारात बटाट्याची आवक कमी होत असल्याने दर १७ ते १८ रुपये प्रतिकिलोपर्यत पोहोचले आहेत. बाजारात सध्या नवीन बटाटा दाखल झालेला नाही. शीतगृहांमध्ये साठवलेला मालच बाजारात येत आहे. त्यामुळे दरात आणखी वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हंगाम सुरू होताच नवीन बटाट्याची आवक हळूहळू वाढेल, तसे भाव पुन्हा पूर्वपदावर येतील, असे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. बाजारात कांदा सध्या ५४ रुपये प्रतिकिलो, तर लसूण १३० ते १६० रुपये प्रतिकिलो आहे. मात्र, बटाटा १७ ते १८ रुपये किलो; तर काही प्रमाणात दाखल होणारा नवीन बटाटा जास्तीत जास्त १३ ते १४ रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. 

किरकोळ बाजारात कांदा-लसणासह बटाटाही दुप्पट दराने अर्थात २५ रुपये प्रतिकिलो दराने घरात खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातील दरांवर निर्बंध घालण्याची गरज आहे. 
- प्राजक्ता काळे, गृहिणी.

यंदा पावसामुळे उशिराने लागवड झाली. त्यामुळे लावलेला बटाटादेखील पावसामुळे शेतात खराब झाला आहे. त्यामुळे नवीन बटाटा डिसेंबर-जानेवारीमध्ये बाजारात येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर दर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. 
- दत्ता सातपुते, व्यापारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the increase in potatoes, the budget of the housewives will fall