नवी मुंबईतील क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

नवी मुंबई महापालिका स्वच्छता आणि पाणी या नागरी सुविधा पुरविण्यात अव्वल असली तरी येथील दूषित वातावरणामुळे टीबीच्या (क्षयरोग) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ही बाब खुद्द नवी मुंबई महापालिकेच्या २०१८-१९ च्या पर्यावरण स्थिती अहवालात नमूद करण्यात आली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका स्वच्छता आणि पाणी या नागरी सुविधा पुरविण्यात अव्वल असली तरी येथील दूषित वातावरणामुळे टीबीच्या (क्षयरोग) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ही बाब खुद्द नवी मुंबई महापालिकेच्या २०१८-१९ च्या पर्यावरण स्थिती अहवालात नमूद करण्यात आली आहे. हीच नोंद २०१६-१७ च्या पर्यावरण स्थिती अहवालातही  आढळून येत आहे. त्यामुळे मनपाची आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे समोर आले आहे.

नवी मुंबई महापालिकेकडून सातत्याने टीबी निर्मूलनासाठी कार्यक्रम राबविले जात आहेत. तसेच मोफत औषधोपचारही केले जात आहेत. मात्र, तरीही या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. २०१५ मध्ये या रुग्णांची संख्या १७९५ होती. ती २०१६ मध्ये नवीन व पुन्हा उपचार घेणारे रुग्ण धरून, ती १९०९ इतकी म्हणजेच ६.३ टक्‍क्‍यांनी वाढली होती. २०१७-१८ मध्ये टीबीच्या रुग्णांची संख्या ७६७ होती. ती २०१८-१९ मध्ये ७९० पर्यंत पोहचली. तसेच फुप्फुसाच्या टीबीमध्येही वाढ होत गेली असून, सुमारे १३ टक्‍क्‍यांनी त्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. २०१७-१८ मध्ये ती ६७७, तर २०१८-१९ ती वाढून ७६२ वर पोहचली. याच कालावधीत मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट झाली असून, टायफॉईडच्या २०१८ च्या घटनांमध्ये ५ पटीने वाढ झाली असून, ती ७ वरून ३९ पर्यंत आली आहे. तसेच हेपेटायटीस-बीच्या रुग्णांत ० ते ९ इतकी वाढ झाल्याचे २०१८-१९ च्या पर्यावरणस्थिती अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.  

हवेमार्फत पसरल्या जाणाऱ्या रोगांपैकी एक जुनाट आणि जर्जर रोग म्हणजे क्षयरोग आहे. रोगजंतू श्‍वसनामार्फत संपर्कात आल्याने क्षयरोगाची बाधा होते. मायक्रोबॅक्‍टेरियाच्या मायक्रोबॅक्‍टेरियम ट्युबरक्‍युलोसिस जातीमुळे क्षयरोग होतो. भारतामध्ये क्षयरोग हे मानवी मृत्यूचे कारण असून, दरवर्षी तीन लाखांपेक्षा अधिक व्यक्ती या रोगाच्या बाधेमुळे मृत्यू पावतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in TB patients in Navi Mumbai