मार्केटला जाताय, जरा जपून! 'यांचा' आहे तुमच्या मोबाईलवर डोळा..

मार्केटला जाताय, जरा जपून! 'यांचा' आहे तुमच्या मोबाईलवर डोळा..
मार्केटला जाताय, जरा जपून! 'यांचा' आहे तुमच्या मोबाईलवर डोळा..

नवी मुंबई : वाशीतील फळ आणि भाजीपाला बाजारात (एपीएमसी) पैशांसह मोबाईलचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याशिवाय व्यापाऱ्यांचा उरलेला शेतमालही चोरीला जात असल्यासाचे प्रकार घडत आहेत. अनेकदा तक्रार करूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, बाजार समितीची सुरक्षा व्यवस्था याबाबत कुचकामी ठरत आहे. 

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत परराज्यांतून मोठ्या प्रमाणात फळ व भाजीपाल्याची आवक होते. त्यामुळे या ठिकाणी व्यापारी, शेतकरी, गाड्यांचे मालक-चालकांसह वाहकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. यासोबत ग्राहकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असते. येथील गाळेधारक व्यापाऱ्यांना वर पोटमाळ्याची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी व्यापाऱ्यांचे पैसे, उरलेला माल ठेवण्यात येतो. या मालासह पैसे चोरीला जात आहेत. मोबाईल चोरीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. चोरीच्या या वाढत्या घटनांमुळे हमालांसह व्यापाऱ्यांनाही धास्ती वाटत आहे. डळमळीत सुरक्षा व्यवस्थेचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहेत. त्यामुळे बाजार समितीतील सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे. 

बाजारातील गाळ्यांच्या मोकळ्या जागेत रात्री हमाल झोपतात. त्यांचे मोबाईल चोरी होण्याचे प्रकार घडत आहेत. पोटमाळ्यांचे दरवाजे, तिजोरी तोडून पैसे लंपास केले जात आहेत. बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांचेही मोबाईल चोरीला जात आहेत. बाजार समितीत रोज येणाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र त्याची आतापर्यंत योग्य अंमलबजावणी झालेली नाही. त्यातच माल आल्यावर प्रत्येक गाडीचा परवाना व कोडचीदेखील चाचपणी केली जात नाही. वाहनचालकांना आहे तसा प्रवेश देण्यात येतो. त्यामुळे बाजार समितीत असुरक्षितता निर्माण होत आहे, असे नितीन वाळुंज या व्यापाऱ्याने सांगितले. 

ओळखपत्र देण्याविषयी कार्यवाही सुरू केली आहे. हे किती प्रमाणात यशस्वी होते, याविषयी खात्री नाही. कारण शेकडो वाहनचालक येतात. प्रत्येकाला ओळखपत्र देणे शक्‍य नाही. सुरक्षा वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 
- प्रज्ञा तायडे, उपसचिव, भाजीपाला बाजार. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com