मतदानाचा वाढलेला टक्का भाजपच्या पथ्यावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबईत मतदानात झालेली सुमारे 10 टक्के वाढ भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता असली, तरी शिवसेनाच नंबर एकचा पक्ष राहील; परंतु या दोन पक्षांच्या संख्याबळातील फरक कमी होणार आहे. या कमी झालेल्या फरकाची गंभीर राजकीय किंमत शिवसेनेला चुकवावी लागेल, अशी शक्‍यता आहे.

मुंबई - मुंबईत मतदानात झालेली सुमारे 10 टक्के वाढ भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्‍यता असली, तरी शिवसेनाच नंबर एकचा पक्ष राहील; परंतु या दोन पक्षांच्या संख्याबळातील फरक कमी होणार आहे. या कमी झालेल्या फरकाची गंभीर राजकीय किंमत शिवसेनेला चुकवावी लागेल, अशी शक्‍यता आहे.

मुंबईत 2012 मध्ये 44.75 टक्के मतदान झाले होते. यंदा 55 टक्के एवढे विक्रमी मतदान झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्का भाजपच्या बाजूचा होता. पालिका निवडणुकीतील वाढलेले मतदानही शिवसेनेपेक्षा भाजपच्याच जास्त फायद्याचे असेल, असा अंदाज आहे.

शिवसेना आणि भाजपमधील जागांच्या संख्येत 30 ते 40चा फरक असेल, असा अंदाज सोमवारच्या रात्रीपर्यंत व्यक्त केला जात होता. या अंदाजातही शिवसेना अव्वल होती. आजही कालचाच अंदाज कायम होता; मात्र आज सकाळपासून भाजपचे हक्काचे गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरले होते. तेवढाच मराठी मतदारही रस्त्यावर होता. मराठी मतांमध्ये विभाजन होण्याची शक्‍यता आहे. तर, गुजराती आणि उत्तर भारतीय मतांमध्ये फारसे विभाजन होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या संख्या बळातील फरक कमी होईल, असा तर्क आहे.

मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा भाजपला सर्वाधिक फायदा पश्‍चिम उपनगरातील कांदिवली, मालाड आणि बोरिवली परिसरात होण्याची शक्‍यता आहे. या परिसरातील एकगठ्ठा मतदान भाजपकडे गेले आहे. तर, पूर्व उपनगरात मराठी बहुलभागात वाढलेल्या मतदानाचा सर्वाधिक लाभ शिवसेनेला होऊ शकतो.

कोणाबरोबरही युती न करण्याची भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या संख्याबळातील फरक 20 पेक्षा कमी झाल्यास युती न करता सत्ताधारी होणे अवघड आहे. युती केल्यास शिवसेनेबद्दल नाराजी पसरू शकते. त्यामुळे कोणताही निर्णय शिवसेनेसाठी मारक ठरण्याची शक्‍यता आहे.

Web Title: increase voting goes to bjp