नवी मुंबईतील मोरबे धरणाच्या पाणीपातळीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

सोमवारपर्यत धरणाची पाणीपातळी ८४.०५ मीटर इतकी झाली आहे. मोरबे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ८८ मीटर आहे. आता सतत पाऊस पडत राहिला तर पुढच्या महिन्यात धरण पूर्णपणे भरेल, अशी शक्‍यता पालिकेकडून वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरात मागील आठवडाभरात मुसळधार सुरू असणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोमवारपर्यत धरणाची पाणीपातळी ८४.०५ मीटर इतकी झाली आहे. मोरबे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ८८ मीटर आहे. आता सतत पाऊस पडत राहिला तर पुढच्या महिन्यात धरण पूर्णपणे भरेल, अशी शक्‍यता पालिकेकडून वर्तविण्यात येत आहे.

नवी मुंबई महापालिका हद्दीत आणि सिडकोच्या कळंबोली, कामोठेच्या काही भागांत मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. ही पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज ४३० एमएलडी पाणीपुरवठा करावा लागतो. मोरबे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ८८ मीटर आहे. यासाठी धरणात ३००० मि.मी. पाऊस पडणे गरजेचे आहे. मात्र आतापर्यंत धरण क्षेत्रात एकूण २३७५.५० मि.मी. पाऊस पडला आहे. दररोज सरासरी ३०० ते ३१५ मि.मी. पाऊस पडत आहे. त्यामुळे आता धरणात ८४.०५ मि.मी.पर्यंत पाणी साठले आहे. धरणाची पाणीपातळी पूर्ण होण्यासाठी सरासरी सुमारे ७०० मि.मी. पावसाची आवश्‍यकता आहे. 

आता असलेला पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या १५ दिवसांत धरण पाण्याने भरून वाहू लागेल. मागील वर्षी २६ जुलै रोजी धरण भरुन वाहू लागले होते. जून महिन्याच्या सुुरुवातीला पावसाने हुलकवाणी दिल्यामुळे धरणातील घटती पाणीपातळी पाहून पालिका प्रशासनाने जुलैच्या सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस दर मंगळवारी पाणीकपात करण्यास सुरुवात केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in water level of Morbe Dam, which supplies water to Navi Mumbai