स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईतील सुरक्षेत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नवी मुंबई शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, संवेदनशील भागात पोलिसांचे अतिरिक्त पथक तैनात करण्यात आले आहे.

नवी मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये, यासाठी पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी कंबर कसली आहे. त्याचबरोबर येणाऱ्या सणांच्या पार्श्‍वभूमीवर शहरात शांतता निर्माण होण्यासाठी पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकांऱ्याबरोबर आढावा बैठका सुरू केल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नवी मुंबई शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, संवेदनशील भागात पोलिसांचे अतिरिक्त पथक तैनात करण्यात आले आहे.

पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी नवी मुंबई आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बार, हुक्का पार्लर व जुगार अशा अनैतिक धंद्यांवर आपली वक्रदृष्टी वळवली आहे. यामुळे अनैतिक धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अशा परिस्थितीत शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. नवी मुंबईतून ठाणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या टोल नाका मार्गावर आणि ठाणे-बेलापूर मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. 

कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिस सज्ज झाले असून, शहरातील प्रार्थनास्थळे, रेल्वेस्थानके, बस थांबे, मॉल, शाळा-महाविद्यालये अशा महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची करडी नजर राहणार आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर चौका-चौकात वाहनांची तपासणी करण्यात येणार असून साध्या वेशातील पोलिसदेखील तैनात आहेत. 
- पंकज डाहणे, पोलिस उपायुक्त, नवी मुंबई परिमंडळ १.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased security in Navi Mumbai on the backdrop of Independence Day