शहरीकरणामुळे कर्करुग्णांत वाढ - डॉ. बडवे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मुंबई - शहरीकरणामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. भारतात कर्करोगाचे लाखामागे 100 रुग्ण आढळतात. अमेरिकेपेक्षा हा आकडा कमी असला तरी वाढत्या शहरीकरणाबरोबर हे रुग्ण वाढणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी "क्राऊड मॅनेजमेंट' महत्त्वाचे आहे, असे टाटा कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले.

मुंबई - शहरीकरणामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. भारतात कर्करोगाचे लाखामागे 100 रुग्ण आढळतात. अमेरिकेपेक्षा हा आकडा कमी असला तरी वाढत्या शहरीकरणाबरोबर हे रुग्ण वाढणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी "क्राऊड मॅनेजमेंट' महत्त्वाचे आहे, असे टाटा कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले.

कर्करुग्णांची टाटा रुग्णालयात गर्दी होते. त्यांना जंतुसंसर्गाचा मोठा धोका असतो. ही गर्दी इतर रुग्णालयांकडे वळवली पाहिजे. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये लाखामागे सुमारे 350 कर्करोगाचे रुग्ण आढळतात. भारतात अशा रुग्णांची संख्या वाढत आहे, असे म्हणण्याऐवजी शहरीकरण वाढत असल्याने कर्करोग वाढत आहे असे म्हणणे योग्य ठरेल, असे डॉ. बडवे यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले. टाटा कर्करोग रुग्णालयात पाच वर्षांत नोंद होणाऱ्या कर्करुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वर्षाला सुमारे 65 हजार नवीन कर्करुग्णांची टाटा कर्करोग रुग्णालयात नोंद होते. पाच वर्षांपूवी 30 हजार रुग्णांची नोंद होत असे. कर्करुग्णांचा वाढता आकडा आरोग्य व्यवस्था आणि आर्थिक परिस्थितीवर ताण निर्माण करणारा आहे. यासाठी कर्करोगावर वेळीच आळा घालणे आवश्‍यक आहे, असे डॉ. बडवे म्हणाले.

भारतात कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण शहरी भागात आढळतात. ग्रामीण भागात कर्करोगाचे प्रमाण अत्यल्प आहे. तिथे लाखापैकी 45 जणांना कर्करोग होतो. निमशहरी भागांत लाखामागे 60 ते 70 जणांना कर्करोग होतो. निमशहरी आणि ग्रामीण भागातील कर्करुग्णांची आकडेवारी वाढू नये यासाठीही प्रयत्नांची गरज आहे, असे ते म्हणाले.

शस्त्रक्रियेसाठी मोठी प्रतीक्षा यादी
वाढत्या रुग्णांमुळे शस्त्रक्रियेसाठीची प्रतीक्षा यादी मोठी झाली आहे. अनेकांना महिनाभर शस्त्रक्रियेसाठी वाट पाहावी लागते. सोप्या शस्त्रक्रिया आठवडाभरात होतात. मान आणि डोक्‍याच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीच्या असतात.

सर्व्हायकल कर्करोग शहरात कमी
स्वच्छतेचे प्रमाण शहरी भागात जास्त असल्यामुळे जंतुसंसर्गामुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण शहरात कमी आहे. जंतुसंसर्गामुळे होणाऱ्या सर्व्हायकल कर्करोगाचे शहरी भागात लाखांमागे आठ रुग्ण आढळतात. ग्रामीण भागात सर्व्हायकल कर्करोगाचे एक लाखामागे 30 रुग्ण आढळतात.

आंतरराष्ट्रीय परिषद
वाढते आजार आणि त्या आजारांवर येणारा खर्च वाढत आहे. काही ठिकाणी आरोग्य सुविधा नाहीत, तर काही ठिकाणी त्या असूनही खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही. काही ठिकाणी अल्प खर्चात उपचार असूनही त्याचा दर्जा तितकासा चांगला नाही. जगभरात थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आणि इतर देश काय करतात हे समजून घेण्यासाठी टाटा रुग्णालयातर्फे 27 ते 29 जानेवारीदरम्यान मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे.

Web Title: Increased urbanization cancer patient